‘इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांची आवाजाची पट्टीच बदलली आहे; सगळे चढय़ा आवाजातच बोलतात,’ असा टोला हाणून ‘आपल्या आक्रस्ताळेपणामुळे लोकशाहीला धक्का लागत नाही ना याची काळजी माध्यमांनी घेणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी रविवारी व्यक्त केले.
डॉ. समीरण वाळवेकर यांनी लिहिलेल्या आणि ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘चॅनेल फॉर लाईव्ह’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये डॉ. पटेल बोलत होते. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. डॉ. पटेल या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरूण साधू, स्टार माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर, पद्माकर देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पटेल म्हणाले, ‘‘माध्यमांचा अभ्यास आणि त्यांचे गांभीर्य हरवत चालले आहे. कोणतीही भारतीय वृत्त वाहिनी पाहिली तर त्याचे निवेदक, सूत्रसंचालक, बातमीदार हे ओरडूनच बोलताना दिसतात. यांची देहबोली तर अशी असते की कधी कधी तर कसलेल्या अभिनेत्यांकडून देहबोलीचे प्रशिक्षण घेतले जाते अशी शंका यावी. या सगळ्यामुळे माध्यमांचे स्वरूप, काम हा चेष्टेचा विषय बनत चालला आहे. माध्यमांचा आक्रस्ताळेपणा आणि विषयाच्या मांडणीमध्ये हरवलेली सखोलता, अभ्यास हे लोकशाहीला धोकादायक ठरत आहे, याचे भान माध्यमांनी बाळगायला हवे.’’
यावेळी ठाकरे म्हणाले, ‘‘कादंबरीचे लिखाण ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अत्यंत बारीक गोष्टींचा विचार, अभ्यास आणि कल्पकता आवश्यक असते. कादंबरी आभासी असली, तरी ती वास्तवाशी जवळीक साधणारी करणे हेच कादंबरीकाराचे कौशल्य असते.’’