पुणे : गर्भाशयातील गाठी काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या एका ३५ वर्षीय महिलेचे गर्भाशय काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी खासगी रुग्णालयातील चार डाॅक्टरांविरुद्ध मांजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी खासगी रुग्णालयातील चार डाॅक्टरां विरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता १२५ (ब), ३ (५) अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने हडपसरमधील मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुंढव्यातील केशवनगर भागात राहायला आहेत. त्यांचे ब्युटी पार्लर आहे. २०२३ मध्ये त्यांनी चाचणी (सोनोग्राफी) केली. तेव्हा गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे निदर्शनास आले होते.

उपचारासाठी त्यांना १३ सप्टेंबर २०२५ रोजी मांजरीतील एका खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. सोनोग्राफी चाचणी अहवालच्या आधारे डाॅक्टरांनी गर्भाशयातील गाठ लेझर शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर प्रकार उघड

तक्रारदार महिलेला १७ सप्टेंबर रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले. २६ सप्टेंबर रोजी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्या पुन्हा तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या. तेव्हा तपासणीत गर्भाशय काढून टाकण्यात आल्याचे उघडकीस आले. वैद्यकीय कागदपत्रात याबाबतचा उल्लेख करण्यात आला. महिलेने गर्भाशयातील गाठी काढण्याबाबत परवानगी दिली होती.

गर्भाशय काढण्याबाबत त्यांनी संमती दिली नव्हती. याबाबत त्यांनी डाॅक्टरांकडे विचारणा केली. तेव्हा समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी रुग्णालयातील कागदपत्रे, संमतीपत्र, तसेच शस्त्रक्रियेचा अहवाल तपासला. वैद्यकीय तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. त्यानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला.