दृष्टी गमावलेल्या मुला-मुलींच्या जिद्दीने आणि निष्ठेने मला खूप काही शिकविले. या मुलांसह जगण्याचा नवा अर्थ उमगला. एका मुलाची आई होण्यापेक्षा असंख्य मुलांची आई होण्याचा आनंद अधिक आहे. दृष्टिहीन मुलांनी जीवनामध्ये एक नवी दृष्टी दिली, अशी भावना निवांत अंध मुक्त विकासालयाच्या मीरा बडवे यांनी व्यक्त केली.
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या हस्ते मीरा बडवे यांना मातृस्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथालयाचे सुधीर इनामदार, सुरेश पळसोदकर, प्रतिभा पटवर्धन या वेळी उपस्थित होत्या.
दृष्टिहीन मुलांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी १९९६ मध्ये घरामध्येच ही संस्था सुरू केली. या मुलांकडून शिकताना एक वेगळाच आनंद मिळाला. त्यामुळे मी या मुलांच्या ऋणातच राहणे पसंत करेन, असेही मीरा बडवे यांनी सांगितले. या वाटचालीतील अनुभव त्यांनी सांगितले. नीला सत्यनारायण यांची पुस्तके दृष्टिहीन मुलांना वाचता यावीत यासाठी ती ब्रेल लिपीमध्ये रुपांतरित करण्याची परवानगी बडवे यांनी मागितली. त्या वेळी क्षणाचाही विलंब न लावता नीला सत्यनारायण यांनी ही परवानगी देत असल्याचे जाहीर केले.
गृह विभागाचे काम करीत असताना आलेल्या निधीचा उपयोग समाजाच्या वंचित घटकातील मुलांसाठी करता आला याचे समाधान आहे. माझे काम मीराताईंच्या इतके मोठे नसले तरी माझ्या क्षमतेनुसार शक्य तेवढे देता आले याचा आनंद निश्चितपणाने आहे, असे नीला सत्यनारायण यांनी सांगितले.