मिळकतकरामधील चाळीस टक्क्यांची सवलत कायम ठेवण्यासंदर्भात आणि पूर्वलक्ष्यी प्रभावाने नियमित देयकां व्यतिरिक्त पाठविण्यात आलेल्या फरकाच्या रकमेबाबतचा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाणार आहे. त्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रालयात आज, बुधवारी (१४ सप्टेंबर) बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य शासन यासंदर्भात पुणेकरांना दिलासा देणार,का तोडगा निघेपर्यंत दिलेली स्थगिती कायम ठेवणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : विधी अभ्यासक्रम निकालाबाबत संभ्रम

महापािलका प्रशासनाकडून शहरातील साठ हजाराहून अधिक मिळकतधारकांना थकीत मिळकतकर भरण्याबाबतची देयके पाठविण्यात आली होती. महापालिकेकडून वर्षानुवर्षे देण्यात येत असलेली चाळीस टक्क्यांची सवलत ऑगस्ट २०१९ पासून राज्य शासनाने रद्द केल्याने फरकाची रक्कम मिळकतधारकांना भरावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. मिळकतधारक, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांच्या रोषाला आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा >>> बांधकामे नियमित करण्याकडे नागरिकांची पाठ ; ‘पीएमआरडीए’कडे केवळ ५६६ अर्ज

यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांबरोबर बैठक घेतली होती. त्या वेळी या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देताना मंत्रालयात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येईल, असे पाटील यांनी जाहीर केले होते. माजी सभागृहनेता गणेश बीडकर यांनी बैठकीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पाटील यांच्या पुढाकारातून ही बैठक होणार आहे. राज्याचे प्रधान सचिव, मिळकतकर विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे गणेश बीडकर यांनी सांगितले.