पुणे : मराठा समाजाच्या लग्नांमधील अनिष्ट प्रथा कमी करण्याच्या दृष्टीने यापुढे सुनेला छळणाऱ्या कुटुंबीयांबरोबर रोटी-बेटीचे व्यवहार बंद करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अनिष्ट प्रथा रद्द करण्यासाठी शहरातील मातब्बर घराण्यातील प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच, या बैठकीत अन्य काही ठरावही मंजूर करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर शहरातील मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सकल मराठा समाजाची बैठक सोमवारी झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या पुढाकारातून ही बैठक झाली. माजी महापौर कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, अरविंद शिंदे, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुनील टिंगरे, श्रीकांत शिरोळे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीतील निर्णयांची माहिती अरविंद शिंदे आणि शिरोळे यांनी दिली. या बैठकीमध्ये अनेक मते व्यक्त झाली. या प्रथा बंद करण्यासाठी एक व्यासपीठ करून त्यासाठी कार्यकारिणी करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. मराठा समाजातील ही मानसिकता एका दिवसात कमी होणार नाही. मात्र, त्यासाठी अनेक दिवस काम करावे लागणार असून, त्यासाठी शहर नेतृत्व करेल, असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.
मराठा समाजातील लग्ने यापुढे साधेपणाने होतील. लग्नानंतर सुनेला त्रास दिला, तर त्या कुटुंबाबरोबर रोटी-बेटीचा व्यवहार ठेवला जाणार नाही. याशिवाय, वेळेवर लग्न लावणे, लग्नातील उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवणे, मोठ्या किंवा प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तींच्या लग्नाचे अनुकरण न करणे, असे काही ठरावही या बैठकीत मान्य करण्यात आल्याची माहिती अरविंद शिंदे यांनी दिली.