पुणे : ‘माणूस किंवा लेखक म्हणूनही जगातील सगळेच अनुभव आपण घेऊ शकत नाही. ते अनुभव साहित्यकृती आपल्याला देऊन जातात आणि त्यातून आपली जाणीव विस्तारते. संवेदनशीलतेचा मक्ता केवळ लेखकाकडे नसतो, तर प्रत्येक व्यक्ती ही संवेदनशील असते. परंतु, लिंग, भाषा, प्रदेश ओलांडून तादात्म्य पावणे आणि साक्षीभाव ही व्यवच्छेदक लक्षणे सामान्य माणसापासून लेखकाला वेगळी ठरवतात,’ असे मत ज्येष्ठ लेखिका मेघना पेठे यांनी शनिवारी व्यक्त केले.

विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या वतीने मेघना पेठे यांच्या ‘डंदॅट् बींदेअर्’ या नव्या पुस्तकानिमित्त आयोजित मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या. मराठी साहित्याचे अभ्यासक पंकज क्षेमकल्याणी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘… आणि मेघना पेठे’ या विषयावर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. रूपाली शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आणि विदिशा विचार मंचाच्या संचालक ममता क्षेमकल्याणी आदी या वेळी उपस्थित होते.

पेठे म्हणाल्या, ‘प्रत्येकाच्या मनात एक आनंदाचा ठेवा आणि एक सल असते. तो आनंदाचा ठेवा आणि ती सल साहित्यकृतीत जेव्हा नेमकेपणाने उतरते, तेव्हा ती साहित्यकृती वाचकांना आपलीशी वाटते. मला नेमके हेच म्हणायचे आहे किंवा मी नेमके हेच अनुभवले आहे, असा प्रत्यय वाचकाला जेव्हा एखादी साहित्यकृती वाचल्यानंतर येतो, तेव्हा ती साहित्यकृती मनाला भिडते. प्रत्येक व्यक्ती एकटी असते, काही व्यक्ती त्या एकटेपणावर उपाय करतात, तर कोणी करीत नाहीत. काही व्यक्तींना एकटेपणाच्या अनुभवाला भिडायचे नसते किंवा तो एकटेपणा मान्य करायचा नसतो.’

‘लहानपणापासून मला रोजनिशी लिहिण्याची सवय होती. माझ्या लेखनाची बीजे त्या सवयीमध्ये दडलेली होती. लेखकाला कौतुक सांगायला, निंदा कथन करायला किंवा कैफियत मांडायला व्यासपीठ नसते. नव्याने लेखन करण्यापेक्षा आधीचे सांगू, या भूमिकेतून या पुस्तकाची निर्मिती झाली,’ असे त्यांनी सांगितले.

‘साहित्य क्षेत्रातील कळप, राजकारण, असूया माझ्याही वाट्याला आली. वाचक, प्रकाशक, समीक्षक यांच्या प्रतिक्रिया, लेखक म्हणून माझ्या वाचकांकडून असलेल्या अपेक्षा याविषयीच्या चिंतन आणि लेखनातून हे पुस्तक आकाराला आले. प्रयोगाची खुमखुमी असल्याने प्रकाशक झाले,’ असे पेठे यांनी स्पष्ट केले.

‘मेंढरू राहण्यातच बहुतेकांना रस’

‘समाज असे आपण ढोबळमानाने म्हणतो, तेव्हा एका समाजात अनेक समाज असतात. किती माणसे आधुनिक आहेत? अनेकजण बदलांकडे बारकाईने पाहत नाही. बहुतेकजण भित्रे किंवा आळशी असतात. त्यांना मेंढरू राहायला आवडते. मी बदलायला पाहिजे असे ठरवतो, तेव्हा माणूस आधुनिक होऊ शकतो. पूर्वीप्रमाणेच आजही काही वाचक वरच्या इयत्तेत आहेत, तर काही अजून प्राथमिक शाळेत आहेत,’ याकडे मेघना पेठे यांनी लक्ष वेधले.

‘डंदॅट् बींदेअर्’ हे पुस्तक म्हणजे तथ्यांची मांडणी आहे. तथ्य म्हणजे सत्य नाही. सत्याचा वेगळा अन्वयार्थ निघू शकतो. – मेघना पेठे, ज्येष्ठ लेखिका.