मेळघाटातील दुर्गम भागातले बालमृत्यू कमी करण्याच्या कामात आपलाही खारीचा वाटा उचलण्याची संधी सामान्यांना मिळणार आहे. ‘मैत्री’ या संस्थेतर्फे पुढील तीन महिने मेळघाटात स्वयंसेवकांची धडक मोहीम काढली जाणार असून यात स्वयंसेवक मेळघाटातील बालकांसाठी आरोग्याचे दूत बनणार आहेत. १८ जुलैपासून २८ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे.
धडक मोहिमेसाठी संस्थेने मेळघाटातील १५ दुर्गम गावे निवडली आहेत. या गावांमध्ये चांगल्या रस्त्यांचा अभाव असून पाऊस पडल्यावर गावांचा संपर्क तुटण्याचीही शक्यता असते. यातील प्रत्येक गावात दोन- दोन स्वयंसेवक दहा दिवस राहून काम करणार आहेत. संस्थेचे मधुकर माने म्हणाले, ‘‘गावातील एक वर्षांच्या आतील बालके, गरोदर स्त्रिया आणि तीव्र व मध्यम कुपोषित असलेली बालके यांना दररोज भेटणे, बालकांच्या पालकांशी, गरोदर स्त्रियांच्या कुटुंबांशी गप्पा करणे हे या स्वयंसेवकांचे प्रमुख काम असेल. एक वर्षांच्या आतील बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण या भागात अधिक असून त्यांची माहिती संस्थेने संकलित केली आहे. त्यामुळे दररोज या बालकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे, बाळाच्या आईला बाळाच्या तब्येतीबाबत प्रश्न विचारणे यातून बाळाला झालेले आजार किंवा आजाराचा धोका लवकर कळेल आणि त्याला वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल. गरोदर स्त्रियांच्या प्रसूतीतील संभाव्य धोके ओळखण्यासाठीही त्यांची भेट घेऊन माहिती घेणे फायदेशीर ठरते. तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांचा आहार आणि त्यांना होणारे आजार यावर विशेष लक्ष पुरवले जाणार आहे.’’ आरोग्यविषयक कामांबरोबरच गावातील स्वच्छतेकडे लक्ष देणे, लहान मुलांना वैयक्तिक स्वच्छता शिकवणे या गोष्टीही स्वयंसेवक करणार असल्याचे माने यांनी सांगितले.
मोहिमेत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांनी स्वत:चा प्रवास खर्च स्वत: करायचा असून मेळघाटात राहणे आणि जेवणे यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये संस्थेकडे भरायचे आहेत. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ०२०-२५४५०८८२, ७५८८२८८१९६ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेने केले आहे.
आदिवासी मुलांना शिकवायचंय?
लहान मुलांना शिकवण्याची आवड असणाऱ्यांना आता मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या मुलांना शिकवायला जाता येणार आहे. ‘मैत्री’ या संस्थेचे कायमस्वरूपी काम मेळघाटातील ज्या गावांमध्ये सुरू आहे अशा ठिकाणी आठवडाभर जाऊन तिथल्या लहान मुलामुलींना शालेय पुस्तकाच्या बाहेरचे रंजक धडे देण्याचे काम करण्यासाठीही संस्थेला स्वयंसेवक हवे आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ही मोहीम चालते. या मोहिमेसाठीही स्वयंसेवकांनी स्वत:च्या प्रवासाचा खर्च स्वत: करायचा असून राहण्या- जेवणासाठी प्रतिदिवशी शंभर रुपये भरायचे आहेत.