कोणत्याही झाडाला मोहोर आल्यावर त्याला फुलण्यासाठी अवधी द्यावा लागतो. मेळघाटसारख्या आदिवासी क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य उभारणाऱ्या डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे दांपत्याच्या कामाला मोहर येण्यासाठी त्यांच्या पाठीशी आर्थिक बळ देण्याच्या उद्देशातून ‘मेळघाट-राजहंस’ अभियान सुरू करण्यात आले आहे. ‘मेळघाटावरील मोहर’ या पुस्तकाच्या विक्रीतून निधी संकलित करीत सामाजिक कार्याचा सेतू उभारण्याचा महाराष्ट्रातील हा अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे.
सातपुडा पर्वतातील प्राणमय निसर्गधून असलेले मेळघाट. गरिबी, रोगराई आणि अज्ञानाने जेरीस आलेले बैरागड हे येथील गाव. डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे या दांपत्याने बैरागडच्या कुशीत नवा श्वास फुंकला. त्याची अनोखी कहाणी मृणालिनी चितळे यांनी ‘मेळघाटावरील मोहर’ या पुस्तकामध्ये चितारली आहे. राजहंस प्रकाशनने प्रकाशवाट दाखविलेल्या या पुस्तकाचे वाचकांनी मनापासून स्वागत केले आहे.
कोल्हे दांपत्याच्या कार्याची ओळख करून देणे हा पहिला टप्पा झाला. त्यांना अजून भरपूर काम करावयाचे असून मोठा पल्ला गाठण्यासाठी बैरागडला मदतीचे हात हवे आहेत. आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठीच्या या कार्याला सह-वेदनेचे बळ पाठीशी जोडण्याच्या उद्देशातून ‘मेळघाट-राजहंस’ अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. त्या अंतर्गत ‘मेळघाटातील मोहर’ या पुस्तकाच्या विक्री झालेल्या प्रत्येक प्रतीमागे ५० रुपये हे कोल्हे दांपत्याच्या सामाजिक कार्यासाठीचा निधी म्हणून वेगळे काढले जाणार आहेत. लेखक आणि प्रकाशक या निधीमध्ये स्वतंत्रपणे भर घालून हा निधी कोल्हे दांपत्याच्या मेळघाटातील संकल्पित कामासाठी देण्यात येणार आहे. येत्या ३१ डिसेंबपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. साहित्यप्रेमींनी स्वत:साठी या पुस्तकाची प्रत तर घ्यावीच. पण, मित्र आणि सुहृदाला भेट देण्यासाठी आणखी एक प्रत विकत घ्यावी. ‘मेळघाटातील मोहर’ची एक प्रत म्हणजे आनंदाचा थेंब. असे लाखो थेंब आपण मेळघाटावर उधळूयात, असे आवाहन राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी केले आहे.