पुणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा महाविद्यालये नियमितपणे सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन नाट्यकर्मींची पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठीची तयारी सुरू झाली असून, यंदा पहिल्यांदाच एका वर्षात दुसऱ्यांदा पुरुषोत्तम करंडक स्पर्धा रंगणार आहे. तसेच दोन वर्षांच्या खंडानंतर राज्यातील अन्य केंद्रांवरही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. दरवर्षी ऑगस्टमध्ये स्पर्धेची प्राथमिक फेरी आणि सप्टेंबरमध्ये अंतिम फेरी होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक कामकाजासह स्पर्धेचे वेळापत्रकही बिघडले. २०२० मध्ये स्पर्धा होऊच शकली नाही. तर करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर राज्य शासनाने नाट्यगृहे सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे गेल्या वर्षीची स्पर्धा जानेवारीमध्ये झाली. आता सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे बिगूल वाजले आहे. त्यानुसार १४ ते २९ ऑगस्ट या कालावधीत स्पर्धेची प्राथमिक फेरी, तर १७ आणि १७ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी होणार आहे. त्यानंतर राज्यभरातील अन्य केंद्रांवरही स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. महाविद्यालयेही नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची चर्चा महाविद्यालयीन नाट्यकर्मींमध्ये रंगू लागली आहे. आता टप्प्याटप्प्याने सर्वच गोष्टी पूर्वपदावर येत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे वेळापत्रकही पूर्वपदावर आले आहे. मात्र पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या स्पर्धेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच एका वर्षात दुसऱ्यांदा स्पर्धा होत आहे.

गेल्या वर्षीची स्पर्धा करोनाच्या प्रादुर्भावामुळे उशिराने, जानेवारीमध्ये झाली. तीही केवळ पुणे केंद्रावर झाली. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच एका वर्षात दोन वेळा स्पर्धा होत आहे. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, महाविद्यालये नियमित सुरू झाल्याने स्पर्धा करोनापूर्व काळातील वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आली आहे. तसेच राज्यभरातील अन्य केंद्रांवरही नेहमीप्रमाणे स्पर्धा पार पडेल.

– राजेंद्र ठाकूरदेसाई, चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक