सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या वर्षीही महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी अभ्यासक्रम जाहीर करण्याची तसदी घेतलेली नाही. अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षांच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे सर्व विषयांचे अभ्यासक्रम महाविद्यालयांना अद्यापही देण्यात आलेले नाहीत.
विद्यापीठाचे नवे शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू झाले. नवे सत्र सुरू झाले तरीही अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमाबाबत अजूनही गोंधळाच आहे. या वर्षीपासून अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षांचे (बीई) सर्व विषयांचे अभ्यासक्रम या वर्षीपासून बदलण्यात आले आहेत. या अभ्यासक्रम आराखडय़ाला तांत्रिकदृष्टय़ा विद्यापीठाच्या विद्या परिषदेने संमती दिली आहे. मात्र, महाविद्यालये सुरू होऊनही हा अभ्यासक्रम महाविद्यालयांच्या हाती मिळालेला नसल्याचे काही महाविद्यालयांच्या प्राचार्यानी सांगितले. या शाखेचा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांचा नवा अभ्यासक्रम मंगळवारी महाविद्यालयांना देण्यात आला आहे. मात्र, इतर विषयांचे अभ्यासक्रम मंगळवारी सायंकाळपर्यंत विद्यापीठाकडून देण्यात आले नव्हते, अशी तक्रार महाविद्यालयांनी केली आहे. महाविद्यालये सुरू होऊनही संकेतस्थळावरही हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.
नव्या शैक्षणिक वर्षांपूर्वी किमान पंधरा दिवस नवा अभ्यासक्रम महाविद्यालयांना मिळणे अपेक्षित असते. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार महाविद्यालयाला त्यांच्याकडील काही सुविधाही अद्ययावत करायच्या असतात. त्याचप्रमाणे वर्षभराचे नियोजनही करायचे असते. विद्यार्थ्यांनाही वर्षांच्या सुरुवातीला संदर्भपुस्तकांची माहिती देणे आवश्यक असते. मात्र, दरवर्षी बदललेले अभ्यासक्रम उशिरा मिळतात. महाविद्यालय सुरू झाल्यावरही हाती अभ्यासक्रमच नसेल तर शिकवायचे काय, असा प्रश्न प्राचार्याकडून विचारण्यात येत आहे.