पुणे : मेट्रो कारशेडचे काम सुरू असताना पन्नास फूट उंचीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ घडली.

मूलचंद्रकुमार सीताराम (वय १९, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ मेट्रो कारशेडचे काम सुरू असताना सीताराम पन्नास फूट उंचीवरून खाली पडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सीतारामला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

सीतारामने सुरक्षाविषयक साहित्य परिधान केले होते. मात्र, पन्नास फूट उंचीवर काम करताना त्याने दोरीला असलेले हूक अडकवले नव्हते. उंचावरुन पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाल्याचे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.

मूलचंद्र गेल्या तीन महिन्यांपासून पुण्यात काम करत होता. कामगाराचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असून दुर्घटनेची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी मेट्रोकडून सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे मेट्रोचे सरव्यवस्थापक (जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी सांगितले.