पुण्याच्या मेट्रो प्रकल्पासाठी देऊ केला जात असलेला चार एफएसआय आपल्याला हवा आहे, का शहरासाठी मेट्रो हवी आहे याचाच विचार करण्याची वेळ आता आली आहे, असा स्पष्ट पवित्रा घेत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी चौपट एफएसआयला विरोध केला आहे. मेट्रोसाठी गर्दी आणि निधी हवा म्हणून चार एफएसआय दिला जात असेल, तर अशी मेट्रो न झालेलीच बरी, अशा शब्दात त्यांनी एफएसआयबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
मेट्रोचे ३१.५ किलोमीटर लांबीचे दोन मार्ग शहरात प्रस्तावित असून या मार्गालगत दोन्ही बाजूंना पाचशे मीटपर्यंत चार चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला हरकती-सूचना नोंदवण्यासाठी सोमवार (११ ऑगस्ट) पर्यंत मुदत असून पुण्यातील अनेक जागरूक नागरिक तसेच पर्यावरणवादी संस्था-संघटनांनी या प्रस्तावाला विरोध करत हरकती नोंदवल्या आहेत. या प्रस्तावाबद्दल खासदार वंदना चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना तीव्र खेद व्यक्त केला. अशा प्रकारे एफएसआय देण्याचा प्रस्ताव जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ातही मांडण्यात आला आहे. तेव्हापासून मी त्या विरोधात आवाज उठवला आहे; पण त्याची फारशी कोणी दखल घेतलेली नाही आणि या भूमिकेबाबत कोणी फारसे साहाय्य देखील केलेले नाही, असे त्या म्हणाल्या.
मुळात मेट्रो मार्गाच्या बाजूने लोकसंख्येची घनता वाढवायची आणि ती वाढवण्यासाठी जादा एफएसआय द्यायचा हा प्रस्ताव पुणे शहरासाठी चुकीचाच आहे. जगभर मेट्रो वा बीआरटीसाठी लोकसंख्येची घनता वाढवतात. कारण तेथे मुळातच लोकसंख्या विरळ व कमी असते. भारतात मात्र दिल्ली, मुंबई, कोलकाता अशी जिथे मेट्रो झाली, तिथे अशी घनता वाढवण्यात आलेली नाही. मग पुण्यातच घनता का वाढवली जात आहे, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला आहे. अशा प्रकारे लोकसंख्येची घनता वाढवण्याची भारतात गरज नाही. पुण्यातही नाही. कारण मेट्रोसाठी जो मार्ग निवडला आहे तो मुळातच दाट लोकसंख्येच्या भागातून जाणारा आहे. त्यामुळे तिथे जादा एफएसआयची गरजच नाही. गर्दीच्या भागात असा चौपट एफएसआय देऊन जी परिस्थिती उद्भवणार आहे तिचा विचार करून योग्य नियोजन करणे अतिशय गरजेचे ठरणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

मेट्रोसाठीच्या जादा एफएसआयमुळे गर्दीच्याच भागात आणखी उंच इमारती उभ्या राहतील. त्यातून निवासी इमारतींची आणि व्यापारी इमारतींची संख्या वाढेल. त्यामुळे आधीच अरुंद व वाहतुकीची व पार्किंगची समस्या असलेल्या भागात वाहनांची संख्या व गर्दी आणखी वाढेल. या एफएसआयच्या वापरानंतर त्या भागात मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध कशा करून देणार, हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा विचार केला, तर हा जादा एफएसआय देण्याचा प्रस्ताव चुकीचा ठरणार असून त्याला आम्ही तीव्र विरोध करत आहोत.
प्रशांत इनामदार, निमंत्रक, पादचारी प्रथम संघटना