राज्याचे मुख्यमंत्री पुणे मेट्रोचा प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत असून हा प्रकल्प शासनाने लवकरात लवकर मार्गी लावला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा खुद्द महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
केंद्राच्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोला फक्त १० कोटींची तरतूद करण्यात आली असून ही तरतूद अत्यंत अल्प आहे. पुणे मेट्रोला १० कोटी देतानाच नागपूर मेट्रोला मात्र ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुणे मेट्रोसाठी भरघोस तरतूद मागणे आवश्यक होते. मुख्यमंत्री हे नागपूरचे नसून महाराष्ट्राचे आहेत, असे सांगून महापौर जगताप म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रो प्रकल्प रखडल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने आगामी अर्थसंकल्पात मेट्रोसाठी पुरेशी तरतूद करणे आवश्यक आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नगरविकास मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रकल्प तातडीने मार्गी लावावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही महापौरांनी यावेळी दिला. पुणे मेट्रो प्रकल्पाला कोणी वाली नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. कोणाचीही या प्रकल्पाबाबतची भूमिका स्पष्ट नाही.