मुंबई-बंगळूरू नवा द्रुतगती महामार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

पुणे : पुणे ते सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, लोणावळा, अहमदनगर यांसह सगळ्या ब्रॉडगेज मार्गांवर आठ डब्यांची मेट्रो सेवा एसटीच्या तिकीट दरात सुरू करण्याची योजना आखण्यात आल्याचे केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी जाहीर के ले. त्याचबरोबर ४० हजार कोटी रुपयांचा खर्च करून मुंबईपासून बंगळूरूपर्यंत नव्या द्रुतगती महामार्गाचे काम करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी के ली.

पुणे महापालिकेतर्फे आयोजित उड्डाणपुलाच्या भूमिपूजन समारंभात गडकरी यांनी या घोषणा केल्या. पुणे जिल्ह्यातील २२१ किलोमीटर लांबीच्या २२ महामार्ग प्रकल्पांचा प्रारंभही गडकरी यांच्या हस्ते झाला. यापैकी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यात १३४ कोटींची कामे होणार आहेत. 

एसटीच्या तिकीट प्रवासात मेट्रोचा प्रवास करण्यासाठी एक नवी योजना हाती घेण्यात येणार आहे. पुण्याहून सातारा, सांगली, कोल्हापूर, बारामती, लोणावळा, अहमदनगर या ब्रॉडगेज मार्गावर ही सेवा सुरू करण्यात येईल. या मेट्रोसाठी प्रती किलोमीटर १ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ही मेट्रो आठ डब्यांची असून या मेट्रोचा वेग प्रती तास १४० किलोमीटर एवढा असेल. त्यामध्ये इकॉनॉमी क्लासचे चार डबे, विमानसेवेप्रमाणे दोन बिझनेस क्लासचे डबे असतील. याद्वारे मालवाहतूकही करण्यात येईल. तसेच स्थानिक बेरोजगारांनाही यामाध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. या सेवेमुळे पाच ते सहा तासांचे अंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण करता येईल, असे गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले की, पुण्यापासून बेंगळुरूपर्यंत चाळीस हजार कोटी रुपये खर्च करून नव्या द्रुतगती महामार्गाच्या कामाला याच वर्षी सुरुवात होणार आहे. हा रस्ता पुण्याबाहेरून फलटण, सांगली आणि बेळगाव मार्गे बेंगळुरूपर्यंत असेल. या महामार्गालगतच्या जागेचे भूसंपादन करण्याचा प्रयत्न महापालिके ने करावा. त्यासाठी पाच ते दहा हजार कोटी भूसंपादनासाठी लागतील. ते दिले जातील. मात्र जागा ताब्यात घेऊन महापालिके ने तेथे जुळे पुणे शहर विकसित करावे. पुण्यातून हा रस्ता कशा पद्धतीने जाईल, याचे सादरीकरण करण्यात येईल.

वाघोली-शिरूर ५० किलोमीटरचा नवा आराखडा

वाघोली ते शिरूर या ५० किलोमीटर मार्गाचा नवा आराखडा करण्यात आल्याचेही गडकरी यांनी सांगितले. या मार्गादरम्यान तळमजल्यावर आठ मार्गिका आणि पहिल्या मजल्यावर सहा मार्गिकांचा उड्डाणपूल असेल, असेही त्यांनी जाहीर के ले. तळेगांवपासून अहमदनगरपर्यंत अशा पुलांची योजना आहे. त्यासाठी पन्नास हजार कोटींची आवश्यकता आहे. हा खर्च केंद्राकडून करण्यात येईल. राज्य शासनाने त्यासाठी निधी देऊ नये मात्र वस्तू आणि सेवा कर माफ करण्याबरोबरच सिमेंट, माती आणि अन्य बाबींसाठीची रॉयल्टी आकारू नये, असे गडकरी यांनी सांगितले.