पुणे : पुणे मेट्रोची सेवा मंगळवारी अचानक अर्धा तास खंडित झाली. रुबी हॉल ते वनाझ मार्गावरील मेट्रो सुमारे अर्धा तास नळस्टॉप स्थानकावर थांबून होती. मेट्रोच्या ओव्हरहेड केबलला पक्षी धडकल्याने वीजपुरवठा खंडित होऊन सेवा बंद झाल्याचे समोर आले आहे.
रुबी हॉल स्थानकातून वनाझकडे निघालेली मेट्रो नळस्टॉप स्थानक आल्यानंतर थांबली. त्यानंतर गाडीचे दरवाजे उघडले. गाडीचे दरवाजे नेहमीच्या वेळेत बंद झाले नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. गाडी नळस्टॉप स्थानकावर सुमारे अर्धा तास थांबून होती. अखेर काही वेळाने मेट्रोतून घोषणा करून दिलगिरी व्यक्त करीत प्रवाशांना तांत्रिक कारणामुळे गाडी थांबल्याचे जाहीर करण्यात आले. प्रवाशांना दुसऱ्या फलाटावर जाण्याची सूचना करण्यात आली. प्रवासी दुसऱ्या फलाटावर गेल्यानंतर पुन्हा मूळ फलाटावर येण्याची सूचना करण्यात आली. तांत्रिक दोष दूर झाला असून, गाडी त्याच फलाटावरून सुटेल, असे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा धावतपळत मूळ फलाट गाठावा लागला.




हेही वाचा >>>हिंजवडीत महिलेच्या प्रियकराचा खून; मृतदेह मुळशी धरणात टाकला; पती अटकेत
मेट्रोच्या ओव्हरहेड केबलला पक्षी धडकल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन मेट्रो थांबल्याचे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले. केबलला पक्षी धडकल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मेट्रो सेवा काही काळ बंद पडली, असे सूत्रांनी स्पष्ट केले.