पुणे : पुण्यातील वाहनांची ओळख असलेली ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आली आहे. मात्र, ‘एमएच १२ १ ए’ या नव्या मालिकेसह पुण्याची ओळख कायम ठेवण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
या मागणीला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यासंदर्भातील मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर नव्या मालिकेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सध्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) ‘एमएच १२’ अंतर्गत शेवटची ‘झेड झेड’ ही सिरीज सुरू असून, लवकरच ती संपणार आहे. ही मालिका संपल्यानंतर तीन अक्षरी सिरीज सुरू करणे शक्य नव्हते. पुण्यासाठी ‘एमएच ६१’ या नव्या क्रमांकाची चर्चा सुरू होती. त्यामुळे ‘एमएच १२’ ही पुण्याची ओळख पुसली जाण्याची शंकाही व्यक्त करण्यात येत होती. याबाबत मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला.
दरम्यान, पुणे आरटीओने रस्ते व महामार्ग मंत्रालयाला ‘एमएच १२’च्या पुढे ‘१ ए’ अशी मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. देशात प्रथमच वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरांच्या सिरीजमध्ये ‘अंक’ आणि ‘अक्षर’ यांचा एकत्रित वापर केला जाणार आहे. नवीन मालिका सुरू होईपर्यंत वाहन खरेदी करणाऱ्या पुणेकरांना ‘एमएच ६१’ या आरटीओ कोडने वाहनांचे रजिस्ट्रेशन करून देण्यात येणार आहे.
सणासुदीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही काळानंतर या वाहनांनाही नव्या मालिकेत रुपांतरीत करण्याची सुविधा किमान निर्धारित शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
