पुणे : सहायक प्राध्यापक पदासाठी २६ जुलै रोजी प्रस्तावित असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, आषाढी वारीमुळे उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, ६ सप्टेंबर ही परीक्षेची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत विभाग आहे. सेट विभाग हा राज्य शासनाची समन्वयक संस्था, तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र, गोवा राज्यात सेट परीक्षा आयोजित केली जाते. त्यानुसार ४१वी सेट परीक्षा २६ जुलै रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरतीअंतर्गत विविध विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. आहेत. सेट परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे उमेदवारांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित रहाता येईल, त्यामुळे त्यांचे नुकसान होईल. तसेच ७ जुलै, २०२६ ते २५ जुलै या काळात आषाढी वारी असल्याने २६ जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि उमेदवारांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पार्श्वभूमीवर २६ जुलै रोजीची सेट परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, आषाढी वारीमुळे कोणताही उमेदवार सेट परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख ६ सप्टेंबर, २०२६ अशी जाहीर करण्यात आली आहे. या बाबत काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील १५ दिवसांत सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.