पुणे : पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील तीन हजार घरांसाठी मार्च महिन्यात सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे सभापती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी दिली. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ४ हजार १८६ सदनिकांच्या विक्रीची सोडत मंगळवारी आढळराव यांच्या हस्ते झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
म्हाडातर्फे शिरूर येथे ५७४ सदनिका तसेच खराबवाडी येथे १९४ व्यापारी गाळे बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ताथवडे येथील पहिला टप्पा यशस्वी पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या टप्प्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ७५० निवासी आणि अनिवासी गाळे सोडतीत समाविष्ट करण्यात येतील. २० टक्के सर्वसमावेशक योजनेतून काही घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाळुंगे, सोलापूर, बारामती, पुरंदर येथेही गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे, असे शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले.
म्हाडातर्फे गेल्या अडीच वर्षात सुमारे २५ हजार परवडणारी घरे केवळ २० टक्के सर्वसमावेशक योजनेतून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता पुणे, पिंपरी चिंचवड तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील तीन हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे परवडणाऱ्या घराचे स्वप्न पूर्ण होणार होईल, असा दावा आढळराव यांनी केला.
दरम्यान, पुणे विभागातील सोडतीमधून विजेत्या अर्जदारांनी विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने म्हाडाकडे रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे. पात्र अर्जदारांना सदनिका स्वीकारणे अथवा नाकारणे याबाबतचा निर्णय स्वीकृतीपत्रात दिलेल्या मुदतीत घ्यावा लागणार आहे. म्हाडाच्या वती नवीन सॉफ्टवेअर प्रणालीमुळे सामान्य नागरिकांना घरबसल्या वेबसाईट किंवा मोबाइल अपच्या माध्यमातून नोंदणी करणे, अर्ज भरणे आणि ऑनलाईन पेमेंट या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे यांनी सांगितले.
