पुणे : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील सदनिकांसाठी अर्ज भरण्यास येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून, इच्छुकांना २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, ४ हजार ६२४ सदनिकांसाठी आतापर्यंत एक लाख ६५ हजार २८ इतक्या जणांनी अर्ज दाखल केल्याची माहिती ‘म्हाडा’कडून देण्यात आली.

‘म्हाडा’च्या पुणे कार्यालयाने २४ ऑगस्टला २० टक्के सर्वसमावेशक कोट्यातून सदनिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात प्रसिद्ध केली. अर्ज भरताना डोमिसाईल, आयटीआर, तसेच तहसीलदारांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखल्यांची पडताळणी होत नसल्याच्या तक्रारी अर्जदारांकडून ‘म्हाडा’कडे करण्यात आल्या. महाआयटी या संगणक प्रणालीतील बिघाडामुळे हे अडथळे येत असल्याचे ‘म्हाडा’कडून सांगण्यात आले होते. त्यामुळे अर्जांसाठी मुदतवाढ देण्याचे विचाराधीन होते. सदनिकांसाठी आत्तापर्यंत १ लाख ६५ हजार २८ जणांनी अर्जदारांनी नोंदणी केली असून, एक लाख १ हजार ८११ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे.

अर्जदारांनी आयएचएएमएस २.० या प्रणालीत ऑनलाइन पद्धतीने अपलोड केलेले डोमिसाईल प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला महाआयटीकडून तसेच आयकर विवरण हे प्राप्तीकर विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने पडताळणी करण्यात येत आहे. मात्र, त्यास विलंब होत आहे. यापूर्वी ही मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत होती. महाआयटीकडून ३८७२ डोमिसाईल प्रमाणपत्र, ९१४२ उत्पन्नाचे दाखले पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे ‘म्हाडा’ने कळविले आहे.