पुणे : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सदनिकांसाठी अर्जदारांना डोमासाईल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. डोमासाईल प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांना सदनिकेसाठी अर्ज करता येणार नाही.दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना ही अट लागू नाही, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

म्हाडाच्या वतीने https://bookmyhome.mhada.gov.in/ या प्रणालीद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सदनिकाच्या वितरणाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. या प्रणालीद्वारे म्हाडा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांचे वितरण करण्यात येते. या प्रणालीमध्ये अर्जादारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सदनिकेसाठी अर्ज करता येतो. बऱ्याच अर्जदारांनी या प्रणालीद्वारे नोंदणी प्रक्रियाही पूर्ण केली आहे. मात्र, अशा अर्जदारांना डोमासाईल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

सदनिकेसाठी अर्ज दाखल करताना प्रोफाईलमध्ये डोमासाईल प्रमाणपत्र जोडले नसेल तर पुढील पंधरा दिवसांची मुदद देण्यात आली आहे. डोमासाईल प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदनिकेसाठी अर्ज करता येणार नाही. पंधरा दिवसांच्या मुदतीनंतर यासंदर्भातील कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही, अशी माहिती म्हाडा प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.