मुख्य सूत्रधाराच्या घराची झडती

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फूट प्रकरणातील मुख्य सूत्रधार जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा संचालक  डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घराची झडती सोमवारी पोलिसांकडून घेण्यात आली. त्याच्या घरातून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली. देशमुख याच्या कंपनीकडे ‘म्हाडा’च्या भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यानेच प्रश्नपत्रिका फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

‘म्हाडा’  प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख (रा. महेंद्रा अर्‍ँथया, खराळवाडी, पिंपरी, पुणे) याला  रविवारी अटक करण्यात आली. याप्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असून सोमवारी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने डॉ. देशमुख याच्या पिंपरीतील खराळवाडी परिसरात असलेल्या सदनिकेची झडती घेतली. या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.

प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ.  देशमुख याच्याकडे महाराष्ट्रातील कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  पोलीस भरती प्रक्रियेतही या संस्थेने काम केले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

गोपनीयतेचा भंग नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद ग्रामीण, पुणे शहर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, नागपूर, वर्धा, भंडारा, औरंगाबाद शहर, औरंगाबाद कारागृह, सोलापूर आयुक्तालय अशा पोलीस विभागातील वेगवेगळ्या घटक दलांच्या भरती परीक्षा घेण्याचे काम जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसकडे  देण्यात आले होते.  डॉ. देशमुख याने म्हाडाबरोबर झालेल्या करारातील गोपनीयतेचा भंग केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.