पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाकडून (म्हाडा) वितरित करण्यात येणारी सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने महिलेची एक लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांकडून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३७ वर्षीय महिला पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी परिसरात राहायला आहे. फिर्यादी महिला आणि तिच्या पतीची आरोपीशी ओळख झाली.
आरोपीने महिला आणि तिच्या पतीला म्हाडात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला कोढवा भागातील एका इमारतीजवळ बोलाविले. सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एक लाख २० हजार रुपये घेतले.
पैसे घेतल्यानंतर महिलेने सदनिकेबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपीने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
परदेशी चलन व्यवहारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक
परदेशी चलन व्यवहारात (फोरेक्स) गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वानवडी भागात राहायला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. परदेशी चलन व्यवहारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले.
गुंतवणूक केल्यास नफा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना पैसे भरण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात तक्रारदाराने वेळोवेळी ३९ लाख ९५ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब जाधव तपास करत आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५१ वर्षीय महिला विधी महाविद्यालय रस्त्यावर राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजराात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांच्या खात्यात महिलेने नऊ लाख ९१ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यनंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करत आहेत.
