‘म्हणजे’ हा प्रश्न सामान्यत: कोणत्याही शब्दाचा, संकल्पनेचा किंवा विषयाचा अर्थ समजून घेण्यासाठी वापरला जातो. ‘म्हणजे’ असे विचारल्यानंतर जिच्याशी संवाद सुरू असतो, ती व्यक्ती पुन्हा एकदा ते वाक्य उच्चारते किंवा विषय आणि संकल्पना उलगडून सांगते. म्हणूनच मराठी माणसे ‘म्हणजे’ या प्रश्नार्थक शब्दाचा सर्वाधिक वापर करतात. याच ‘म्हणजे’तून आता नावीन्यपूर्ण शब्दखेळाची निर्मिती करण्यात आली आहे. मोबाइलवर अवघ्या दोन मिनिटांत खेळल्या जाऊ शकणाऱ्या या खेळातून दररोज पाच शब्दांची भर आपल्या शब्दसंपत्तीमध्ये पडू शकते. असा हा शब्दखेळ http://www.mhanje.net या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मराठी भाषा शिकण्याची इच्छा अनेकांना असते. पण चुकण्याची भीती, उच्चारांबद्दलचा संकोच किंवा ‘हे पण माहीत नाही?’ अशा प्रतिक्रिया यांमुळे अनेक लोक मराठीपासून थोडे दूरच राहतात. विशेषतः शहरांमध्ये वाढणाऱ्या नव्या पिढीत मराठी ऐकली जाते, पण वापरली कमी जाते. याच विचारातून ‘बी बिरबल’ डिजिटल मंचाने ‘म्हणजे?’ हा छोटा, पण विचारपूर्वक आणि वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. ‘म्हणजे?’मध्ये दररोज पाच नवीन मराठी शब्द दिले जातात. प्रत्येक शब्दासाठी अर्थांचे चार पर्याय असतात. त्या पर्यायांतून योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा असतो. हा खेळ स्पर्धा परीक्षा, गुण किंवा अभ्यास यासाठी बनवलेला नाही. उलट, मराठी भाषेबद्दल उत्सुकता, आपलेपणा आणि दररोजच्या वापरातले शब्द पुन्हा आठवावेत यासाठी हा प्रयत्न आहे, अशी माहिती या शब्दखेळाचे निर्माते, ‘बी बिरबल’चे संचालक गंधार संगोराम यांनी दिली.
या खेळामध्ये फक्त पुस्तकातील कठीण शब्द नाहीत. तर, सोपे आणि आपण आयुष्यात अनेकदा ऐकलेले, पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दही आहेत. कोणतीही भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत, या उद्दिष्टातून हा खेळ तयार केला गेला आहे. त्यामुळे ‘म्हणजे?’मध्ये भाषा शिकविण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर भर देण्यात आला आहे. कोणालाही कमी न लेखता, न्यूनगंड निर्माण न करता, मोकळेपणाने एखाद्याला भाषा सहज सुलभ वाटावी यासाठी ‘म्हणजे?’ तयार केला आहे. भाषेच्या सक्तीपेक्षा आसक्ती वाढावी, हा यामागचा हेतू आहे. हा खेळ लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत, मराठी आणि अमराठी अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी तयार करण्यात आला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा खेळ विनामूल्य उपलब्ध आहे. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आणि त्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा, म्हणून हा खेळ विनामूल्य ठेवण्यात आला आहे, असे गंधार यांनी सांगितले.
‘वर्डल’ किंवा ‘शब्दल’ या पोर्टलपेक्षा ‘म्हणजे’ हा शब्दखेळ वेगळा आहे. ‘म्हणजे? हा खेळ तयार करण्यासाठी जवळपास गेले दहा महिने काम करत आहे. मराठी बृहद्कोशाचा आधार घेऊन यातील शब्द निवडण्यात आले आहेत. फार अनवट, फारसे वापरात नसलेले किंवा आता आठवतही नाहीत, असे शब्द यामध्ये घेतलेले नाहीत. सध्या या खेळात तीन हजार शब्द आहेत. त्यामध्ये सातत्याने नव्या शब्दांची भर पडेल. आपल्या भाषेसाठी आपण काम नाही केले, तर दुसरे कोण करेल, या विचारातून या खेळाची निर्मिती करायचे ठरवले, याकडे गंधार यांनी लक्ष वेधले.
vidyadhar.kulkarni@expressindia.com
