पुणे : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) घेतली जाणारी एमएचटी-सीईटी आणि केंद्रीय लोक सेवा आयोगातर्फे (यूपीएससी) होणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच कालावधीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे अर्ज केल्यास त्यावर सकारात्मक विचार करण्याचे स्पष्टीकरण सीईटी कक्ष संबंधितांनी दिले आहे.
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा सीईटी कक्षा मार्फत आयोजित करण्यात येते. यंदा ही परीक्षा एप्रिल आणि मे अशा दोन सत्रांत घेतली जाणार आहे. त्यांपैकी एप्रिल सत्रातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटाची परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेशासाठीची यूपीएससीतर्फे राष्ट्रीय पातळीवर प्रवेेश परीक्षा घेतली जाते. एप्रिल आणि सप्टेंबर अशी वर्षातून दोन वेळा ही परीक्षा होते. त्यानुसार यंदा १२ एप्रिल रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. एमएचटी-सीईटी आणि एनडीए प्रवेश परीक्षा या बारावीनंतर देता येतात. या दोन्ही परीक्षा एकाच सत्रात होणार असल्याने बारावीची परीक्षा दिलेल्या, प्रामुख्याने सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.
दोन परीक्षा एकाचवेळी होत असल्याबाबत एक पालक म्हणाले, दोन्ही प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यातही एनडीएच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन वर्षे अधिक कठोर मेहनत घ्यावी लागते. दोन्ही परीक्षा एकाच वेळी होत असल्याने विद्यार्थ्यांची संधी हिरावली जाऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची गरज आहे. दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे अर्ज करावा, त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

