पुणे : राज्यात समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत ९९ ते १०० पर्सेंटाइल गुण मिळविणाऱ्या काही विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेतील पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि गणित विषयांची टक्केवारी ६० पेक्षा कमी असल्याचे यंदा आढळले. यामुळे संशयाला वाव मिळत असून, या प्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील काही अभ्यासकांनी केली. दरम्यान, गैरप्रकारांच्या आरोपांबाबत पोलिसांत तक्रार दाखल असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे ‘सीईटी-सेल’ने स्पष्ट केले.

सीईटीच्या निकालात, गुणवत्ता यादीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य काहींनी नुकताच केला. पवार यांनी या प्रक्रियेचे न्यायिक लेखापरीक्षण करण्याचीही मागणी केली. याबाबत शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञांशी याबाबत संवाद साधला असता, त्यांनीही निकालाबाबत शंका घेण्यास वाव असल्याने सखोल चौकशी गरजेची असल्याचे मत व्यक्त केले.

करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर म्हणाले, ‘सीईटीच्या गुणवत्ता यादीसंदर्भात केल्या जात असलेल्या आरोपांमध्ये तथ्य वाटते. दहावी-बारावीला कमी गुण आणि सीईटीला १००, ९९ पर्सेंटाइल मिळण्याचा प्रकार यंदाच घडलेला नाही. गेल्या वर्षीही असे घडले होते. त्यामुळे या प्रकाराची नक्कीच सखोल चौकशी झाली पाहिजे. यंदा घेण्यात आलेल्या आक्षेपांशिवाय गेल्या वर्षीच्या यादीतील संशयास्पद विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी प्रथम वर्षातील कामगिरीही तपासली पाहिजे. त्यातून बरीच स्पष्टता येऊ शकेल.’

‘एमएचटी-सीईटीच्या गुणवत्ता यादीवर शंका घेण्यास वाव आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये यादीबाबत असेच निरीक्षण दिसते आहे. त्यामुळे सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सखोल तपास करावा. संशयास्पद उमेदवारांबाबत पारदर्शकपणे, मोकळ्या वातावरणात अभ्यासक्रमातील संकल्पनांबाबत चर्चा केली, तरी त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतील. काही विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेकडे जास्त लक्ष न देता जेईई-सीईटीच्या अभ्यासावर भर दिल्याने बारावीचे गुण कमी आणि सीईटीला गुण जास्त असेही असू शकते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत गुणवत्ता यादीतील पहिल्या शंभर ते एक हजार विद्यार्थ्यांबाबत हा प्रकार वाढताना दिसतो आहे,’ असे आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले.

‘एकाच परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत पर्सेंटाइल जास्त आणि बारावीला गुण कमी, असे घडणे संशयास्पद आहे. त्यामुळे आरोपांची दखल घेऊन सखोल, निष्पक्ष चौकशी केल्यास नेमकी स्पष्टता येऊ शकेल,’ असे मत नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील काही प्राध्यापकांनी व्यक्त केले.

‘बारावीच्या परीक्षेचे गांभीर्य वाढणे आवश्यक’

‘‘आयआयटी’सारख्या केंद्रीय संस्थांतील प्रवेशांसाठी ‘जेईई’तील आवश्यक गुणांसह प्रवेश पात्रतेसाठी बारावीला ७५ टक्के गुण अनिवार्य आहेत. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशांसाठी मात्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी पीसीएम गटात ४५ टक्के, तर राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुणांची मर्यादा आहे. त्यामुळे अनेकदा विद्यार्थी सीईटीवर लक्ष केंद्रित करून बारावीची परीक्षा फारशी गांभीर्याने घेत नाहीत. राज्यातील प्रवेशासाठीचे पात्रता गुणही किमान ६० टक्के केले, तर बारावीची परीक्षा गांभीर्याने घेतली जाईल,’ याकडे दुर्गेश मंगेशकर यांनी लक्ष वेधले.

‘एमएचटी-सीईटी’च्या निकालाबाबत समाजमाध्यमांत प्रसारित झालेल्या ध्वनिफिती पोलिसांना देण्यात आल्या आहेत. पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, त्यात सीईटी सेलकडून संपूर्ण सहकार्य केले जात आहे.- दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी सेल