पुणे : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्यांची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे.
राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी ९ ते २१ मे या कालावधीत घेण्यात आली. यंदा सहा लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटाच्या तुलनेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटाच्या विद्यार्थ्यांची परीक्षेला अनुपस्थिती अधिक होती. राज्य मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक व बिगरव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेध लागले आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीच्या निकालाकडे लागले आहे. सीईटी सेलने नुकतीच सीईटी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध केली. या उत्तरतालिकेवरील विद्यार्थ्यांच्या हरकती आणि आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर १२ जूनला निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलने दिली.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.