पुणे : चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रांमध्ये सध्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा एकच मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. आधीच अरूंद असलेला रस्ता खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पर्यायी रस्त्याचे पाऊल उचलले आहे. ‘एमआयडीसी’कडून हे काम वेगाने सुरू असून, याद्वारे पुणे-नाशिक महामार्गावरून थेट जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर जाता येणार आहे.

चाकण आणि तळेगाव या औद्योगिक क्षेत्रांचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. औद्योगिकरण आणि शहरीकरण वाढल्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दोन्ही औद्योगिक क्षेत्रांतून तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची वाहतूक क्षमता दररोज १० हजार प्रवासी वाहने आहे. प्रत्यक्षात या रस्त्यावरून तिप्पट म्हणजेच ३१ हजार १९७ प्रवासी वाहने दररोज धावत आहेत. हा रस्ता दुपदरी असून, त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. त्यामुळे त्यावरील वाहतुकीचा वेग संथ आहे. त्यातच हा रस्ते खराब झाल्याने हा वेग आणखी मंदावून मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.

चाकण आणि तळेगावमधील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ‘एमआयडीसी’ने या रस्त्याला पर्यायी रस्त्याचे नियोजन केले. या नियोजनानुसार पर्यायी रस्त्याचे काम वेगाने सुरू असून, ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. नवीन पर्यायी रस्ता हा पुणे-नाशिक महामार्गावर भामा नदीच्या जवळ सुरू होणार आहे. तो चाकण टप्पा क्रमांक पाच, टप्पा क्रमांक दोन, तळेगाव टप्पा क्रमांक दोन आणि तळेगाव टप्पा क्रमांक एकमधून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडला जाईल. यामुळे नाशिकवरून येणारी वाहतूक मुख्य रस्त्याऐवजी पर्यायी रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने जाईल, अशी माहिती ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता प्रकाश भंडांगे यांनी दिली.

चाकण ते तळेगाव प्रवास

सध्याचा रस्ता – तळेगाव-चाकण-शिक्रापूर

प्रवासाचा वेळ – दीड ते दोन तास

लांबी – २६.३० किलोमीटर दुपदरी

पर्यायी रस्ता – चाकण-तळेगाव

प्रवासाचा वेळ – ४५ मिनिटे

लांबी – ३५ किलोमीटर सहापदरी

अखेरपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला

तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचा सगळा ताण तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मुख्य रस्त्यावर आहे. त्याला पर्यायी रस्ता केला जात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, लवकरात लवकर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. या पर्यायी रस्त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्याही सुटेल, अशी माहिती ‘एमआयडीसी’चे अधीक्षक अभियंता नीलेश मोढवे यांनी दिली.

मुख्य रस्त्यावरील वाहतूक कमी होणा

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सध्या एकच मुख्य रस्ता आहे. त्यामुळे त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी एका पर्यायी रस्त्याची आवश्यकता होती. ‘एमआयडीसी’कडून या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या पर्यायी रस्त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक ३० ते ३५ टक्क्यांनी कमी होणार असून, वाहतूक कोंडीची समस्याही कमी होण्यास मदत होणार आहे, असे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल यांनी सांगितले.