पुणे : चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याचे पाऊल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उचलले आहे. या दोन्ही औद्योगिक क्षेत्रांमध्ये चाकण-तळेगाव-शिक्रापूर हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सध्या होते. आता याला पर्यायी रस्त्याचे काम वेगाने सुरू असून, याद्वारे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुणे-नाशिक महामार्गावर जाता येणार आहे.

‘चाकण आणि तळेगाव या औद्योगिक क्षेत्रांचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. औद्योगिकरण आणि शहरीकरण वाढल्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या दोन्ही औद्योगिक क्षेत्रांतून चाकण-तळेगाव-शिक्रापूर हा मुख्य रस्ता आहे.

यामुळे या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते. हे टाळण्यासाठी ‘एमआयडीसी’ने या रस्त्याला पर्यायी रस्त्याचे नियोजन केले होते. या नियोजनानुसार पर्यायी रस्त्याचे काम वेगाने सुरू असून, ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे,’ अशी माहिती ‘एमआयडीसी’तील अधिकाऱ्यांनी दिली.नवीन पर्यायी रस्ता हा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून सुरू होणार आहे. या रस्त्याने देहूरोडकडून तळेगाव औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येईल.

तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील टप्पा एकमधील नवलाख उंबरे गावाबाहेरून नवीन रस्ता करण्यात आला असून, तो टप्पा दोनशी जोडण्यात आला आहे. हा काँक्रीट रस्ता १.७ किलोमीटरचा असून, तो सहापदरी आहे. येथे सध्या नवलाख उंबरे गावातून जाणारा छोटा रस्ता आहे. हा रस्ता अरुंद असल्याने तिथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. नवीन रस्ता सुरू झाल्यानंतर ही कोंडी कमी होणार आहे. यासाठी ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असे ‘एमआयडीसी’तील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ह्युंदाई चौक ते तळेगाव टप्पा दोन आणि चाकण टप्पा दोनमधून हा रस्ता पुढे जाईल. तिथे काँक्रीटचा चारपदरी रस्ता आहे. त्यानंतर चाकण टप्पा दोन आणि टप्पा पाचला या रस्त्याने जोडण्यात आले आहे. कॉर्निंग कंपनीपासून भाम नदीपर्यंत हा रस्ता असेल. तिथे हा रस्ता पुणे-नाशिक महामार्गाशी जोडला गेला आहे. हा रस्ता ६.५ किलोमीटरचा असून, त्यासाठी १०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याला पर्यायी असणारा हा रस्ता एकूण ३५ किलोमीटरचा आहे, असे ‘एमआयडीसी’तील अधिकाऱ्यांनी नमूद केले.

कोट

तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचा सगळा भार सध्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मुख्य रस्त्यावर पडतो. त्याला पर्यायी रस्ता केला जात असल्याने वाहतुकीचा भार कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्याही सुटेल. याचवेळी प्रवासाचा वेग वाढून वेळही वाचेल. नीलेश मोढवे, अधीक्षक अभियंता, एमआयडीसी

तळेगाव आणि चाकणमधील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी एका पर्यायी रस्त्याची आवश्यकता होती. याबाबत आम्ही उद्योग मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. ‘एमआयडीसी’कडून या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून उद्योगांसह स्थानिक नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी. दिलीप बटवाल, मुख्याधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज