पुणे : पुण्यातील औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार होत असताना तेथील पायाभूत सुविधांवरही ताण येऊ लागला आहे. यामुळे नवीन पायाभूत सुविधांची उभारणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली. मात्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या (एमआयडीसी) उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून अखेर ‘एमआयडीसी’ने उद्योगांसाठीच्या सेवाशुल्कात वाढ करण्याचे पाऊल तब्बल १७ वर्षांनंतर उचलले आहे.

पुण्यातील औद्योगिक क्षेत्रांचा वेगाने विस्तार होत आहे. हा विस्तार होत असताना पायाभूत सुविधा मात्र तेवढ्याच राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वच औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिसून येत आहे. औद्योगिक क्षेत्रांसाठी नवीन पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचे पाऊल ‘एमआयडीसी’ने उचलले. मात्र, निधीच्या कमतरतेमुळे त्यात अडचणी येऊ लागल्या. कारण ‘एमआयडीसी’ला मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता.

‘एमआयडीसी’च्या उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक आहे. नवीन पायाभूत सुविधा उभारणीसाठी निधी उभा करण्यासाठी उद्योगांसाठी सेवा शुल्कवाढीचा प्रस्ताव समोर आला. ‘एमआयडीसी’ने यंदा जुलैमध्ये तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रात सेवा शुल्कात वाढ केली. त्याच आधारावर ऑक्टोबरमध्ये हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये सेवा शुल्कात वाढ करण्यात आली, अशी माहिती एमआयडीसीतील सूत्रांनी दिली.

हिंजवडी आयटी पार्क, तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रात आता ‘एमआयडीसी’चे वार्षिक सेवा शुल्क प्रति चौरस मीटर ४.५० रुपयांवरून १५ रुपये झाले आहे. यासाठी ‘एमआयडीसी’ने हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज आणि तळेगाव इंडस्ट्रीज असोसिशनशी सुरुवातीला चर्चा केली. या उद्योग संघटनांशी चर्चा करून त्यांना संबंधित औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे आणि त्यासाठी होणारा खर्च याचे गणित मांडण्यात आले. त्यासाठी सेवा शुल्कात वाढ करणे आवश्यक असल्याची भूमिका मांडण्यात आली. उद्योग संघटनांशी चर्चेअंती ‘एमआयडीसी’ने सुधारित सेवा शुल्काचा दर निश्चित केला, असे ‘एमआयडीसी’तील सूत्रांनी स्पष्ट केले.

नवीन वार्षिक सेवा शुल्क (प्रतिचौरस मीटर)

५०० चौरस मीटरपर्यंत – १२ रुपये
५०० ते २ हजार चौरस मीटरपर्यंत – १३ रुपये
२ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक – १५ रुपये

‘एमआयडीसी’ने गेल्या १७ वर्षांत सेवा शुल्कात कोणतीही वाढ केलेली नव्हती. उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याची अनेक कामे ‘एमआयडीसी’ने हाती घेतली आहेत. यासाठी निधी उपलब्ध व्हावा, म्हणून उद्योग संघटनांशी चर्चा करून सेवा शुल्कात माफक वाढ करण्याचे पाऊल एमआयडीसीने उचलले आहे. – कालिदास भांडेकर, मुख्य अभियंता, एमआयडीसी

‘एमआयडीसी’कडून सेवा शुल्कातील वाढीबाबत चर्चा सुरू होती. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सेवा शुल्कात वाढ करण्याची भूमिका एमआयडीसीने घेतली. यामुळे आम्ही ही वाढ स्वीकारली. या वाढीमुळे एमआयडीसीच्या महसुलात वाढ होणार असून, हा निधी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी वापरला जाईल, अशी अपेक्षा आहे. – कर्नल (निवृत्त) शंकर सालकर, मुख्याधिकारी, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन