scorecardresearch

मुळशी तालुक्यातील दरडप्रवण घुटके गावातील १४ कुटुंबांचे स्थलांतर ; सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कंपनीकडून हातभार

घाटक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य दरड प्रवण क्षेत्रात समावेश असलेल्या मुळशी तालुक्यातील घुटके गावच्या १४ कुटुंबांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या निवासी पत्रा शेडच्या घरांमध्ये स्थलांतर केले आहे.

Migration of families
मुळशी तालुक्यातील दरडप्रवण घुटके गावातील १४ कुटुंबांचे स्थलांतर

पुणे : घाटक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य दरड प्रवण क्षेत्रात समावेश असलेल्या मुळशी तालुक्यातील घुटके गावच्या १४ कुटुंबांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या निवासी पत्रा शेडच्या घरांमध्ये स्थलांतर केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या गावाला भेट देऊन कुटुंब आणि पशुधनाच्या स्थलांतरणाची पाहणी केली.

गेल्या तीन-चार वर्षांपासून शहरासह जिल्ह्यात कमी वेळात जास्त पाऊस होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दरड किंवा भूस्खलन होऊ शकणाऱ्या धोकादायक २३ गावांचे सरकारी, खासगी संस्थांकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. या धोकादायक २३ गावांपैकी १५ गावांतील ग्रामस्थांनी माळीणप्रमाणे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २ जून रोजी प्रकाशित केले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मुळशी तालुक्यातील घुटके गावातील ग्रामस्थांच्या स्थलांतराला सुरूवात करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी पावसानंतर या ठिकाणच्या लोकवस्तीच्या वरील डोंगराच्या जमिनीला एक फुटाची भेग पडल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले होते. त्यानंतर भूवैज्ञानिकांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून अभ्यास केला. अभ्यासाअंती मूळ ठिकाणाहून जमीन सरकल्याचे आढळून आले. तसेच पावसादरम्यान या भेगेतून पावसाचे पाणी पाझरून जमिनीखाली कठीण खडकाच्यावरून आणि घरांच्या पायाखालून वाहत असल्याचेही निदर्शनास आले. ही बाब लोकवस्तीला धोकादायक असल्याने गेल्यावर्षी तेथील कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभामंडपात स्थलांतरीत केले होते.

दरम्यान, गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी या पुनर्वसनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि सरपंच श्रीराम वायकर यांनी जमीन दिल्याबद्दल तसेच फियाट इंडियाचे राकेश बावेजा यांनी सामाजिक उत्तरदायित्व दाखवून या निवासी शेडच्या बांधकामाला निधी पुरवल्याबद्दल या कुटुंबांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मुलभूत सुविधा

फियाट इंडिया प्रा. लि. च्या सहकार्याने प्रत्येकी दोन खोल्यांची १६ पत्र्याच्या शेडची निवारा केंद्रे बनवण्यात आली असून त्यासाठी गावचे सरपंच श्रीराम वायकर यांनी जमीन दिली आहे. याव्यतिरिक्त पुणे जिल्हा परिषदेने या कुटुंबांच्या पशुधनासाठी गोठे बांधले आहेत. जिल्हा परिषदेने या लोकवस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी आठ लाख खर्चून पाणीपुरवठा योजना उभारली असून सौरदिवे तसेच अन्य मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या आहेत. गॅस सिलिंडर, शेगडीही देण्यात आली असून करोना काळजी केंद्रांमधील खाटा, तसेच न वापरलेल्या नवीन गाद्याही या प्रत्येक कुटुंबांना देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Migration of 14 families from ghutke village in mulshi taluka pune print news amy

ताज्या बातम्या