पुणे : पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संभाव्य दरडप्रवण, भूस्खलन होणाऱ्या अतिसंवेदनशील गावांची प्रशासकीय पातळीवर तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार धोक्याच्या ठिकाणावरील स्थानिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे. सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होत राहिल्यास कमी धोका असणाऱ्या गावातील नागरिकांचे देखील तत्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची दहा पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात माळीण येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत मदत व पुनर्वसन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संभाव्य धोका असणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तत्पूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या विभागामार्फत स्थानिक पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २३ गावांना पावसाळय़ामध्ये धोका निर्माण होईल अशी शक्यता सर्वेक्षणाअंती व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या आठवडय़ात आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ासंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये संभाव्य धोका असणाऱ्या गावांमधील सुरक्षिततेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला आदेश दिले आहेत.  हवामान विभागाने यंदाही सरासरीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांतील पाऊस पाहता प्रथम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दहा तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. तालुकानिहाय एका तुकडीत ५०० प्रशिक्षित अधिकारी, जवान, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, अतिवृष्टी झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  अशा गावांची पाहणी करून त्या गावात ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांना संबंधित गावांमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सलग तीन दिवस संततधार पाऊस झाल्यास तत्काळ स्थानिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.

सात तालुक्यांत स्वतंत्र तुकडय़ा

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या सात तालुक्यांमधील धोकादायक गावांमध्ये स्वतंत्र तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. या तुकडय़ांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी संपर्क कक्ष स्थापन करम्ण्यात आला असून तुकडय़ांमधील संपर्क प्रमुखाने २४ तास संपर्कात रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तुकडय़ा तैनात करम्ण्यात आल्या असून प्रशासनातील सर्व विभागांना सूचना करण्यात आल्या असल्या, तरी स्थानिक पातळीवरील माहिती प्रशासनापर्यंत पोचण्यासाठी किंवा प्रशासकीय व्यक्ती घटनास्थळी पोचण्यापर्यंत कालावधी लागत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांनी परस्पर संपर्कात रहावे. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रालगत असणाऱ्या गावांनी आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करावे. त्यांचे सहकार्य लाभल्यास शासकीय पातळीवर प्रश्न सोडवण्यास मदत होईल. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी