पुणे : ‘साहित्य क्षेत्राला तरूण नेतृत्वाची, सामर्थ्याची गरज आहे, ही जाणीव सातारा येथे आयोजित केलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेतून झाली,’ असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
‘मरगळलेल्या साहित्यविश्वाला उत्साह देण्याचे कार्य या संमेलनाच्या माध्यमातून झाले. साहित्य रसिकांना पुन्हा साहित्याच्या मांडवाखाली आणण्यात यश आले. नेमक्या आणि नेटक्या आयोजनासाठी हे संमेलन गाजले, याचा आनंद आहे. हे शिवधनुष्य विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लीलया पेलले,’ असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
आडकर फाउंडेशनतर्फे माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जोशी बोलत होते. विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद आडकर, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत या वेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, ‘सातारा येथील शतकपूर्व संमेलन अभूतपूर्व करण्याच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच नियोजन करण्यात येत होते. नियोजनात अचूकता, धीरोदात्तता आणि समन्वय यावर भर देण्यात आला. नकारात्मक शक्तींना नामोहरम करण्यासाठी सातत्याने जागरूक राहिलो. विविध विचारधारांचे लोक एकत्र आणत वेगवेगळ्या विचारप्रवाहांना सहभागी करू शकलो, हे या संमेनलाचे मोठे संचित होय.’
‘विनोद कुलकर्णी यांच्या रूपाने साहित्यक्षेत्राला उत्तम नेतृत्व मिळाले. आदर्शवत ठरलेल्या या संमेलनाच्या कार्यपद्धतीची, मार्गदर्शक प्रणालीची कार्यपुस्तिका तयार करणे आवश्यक आहे. उत्तम नियोजन, समन्वय याचा आदर्श वस्तुपाठ या संमेलनातून समोर आला. संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार, लेखक-वाचक जोडण्याचे कार्य घडले,’ असे दळवी म्हणाले.
‘विक्रमांचे संमेलन करण्याचे पाहिलेले स्वप्न या यशामुळे साकार झाले. साताऱ्यातील संमेलनाच्या यशस्वीतेमागे हजारो हातांचे सहकार्य लाभले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भरभक्कम साथ लाभल्याने हे संमेलन राजाच्या गावातील संमेलन म्हणून दीर्घकाळ लक्षात राहील,’ अशी भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
चांदीच्या ताटात जेवण कशासाठी ?
संमेलनात चांदीच्या ताटात भोजन कशासाठी या टीकेला उत्तर देताना मिलिंद जोशी म्हणाले, ‘सोन्यासारखे विचार सांगणाऱ्या साहित्यिकांना चांदीच्या ताटात भोजन देण्याची इच्छा होती. ती पूर्ण करता आली, याचे मोठे समाधान आहे. चांगले काम केल्यानंतरही चुका, उणीवा काढणारे अनेकजण असतात.’
