Military Institute of Technology MILIT Pune: ‘संरक्षणाचे मानबिंदू’ या सदरात गेल्या भागात ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी’ या संस्थेविषयी माहिती घेतली. या भागात याच संस्थेतून काही विशिष्ट कारणांसाठी वेगळी संस्था तयार केलेल्या ‘मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘मिलिट’ या संस्थेची माहिती घेऊ.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले. या तंत्रज्ञान सुसज्जतेसाठी आपले दीर्घ काळ प्रयत्न सुरू आहेत. बदलते तंत्रज्ञान आणि त्याची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन संरक्षण दलांतील अधिकाऱ्यांनाही तंत्रज्ञानामध्ये अद्ययावत करण्यामध्ये पुण्यातील ‘मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘मिलिट’ ही संस्था कार्यरत आहे. संरक्षण दलांतील अधिकाऱ्यांसाठी तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम राबविणारी देशातील ही प्रथम संस्था आहे.

संरक्षण तंत्रज्ञानाशी संबंधित पुण्यातील ही संस्था म्हणजे पुण्याचा मानबिंदूच. विविध प्रशिक्षण संस्थांमध्येही ‘मिलिट’चे वेगळेपण ठळक दिसते. या संस्थेच्या स्थापनेचा इतिहासही ‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट स्टडीज’च्या निर्मितीपर्यंत जातो. नोबेलविजेते पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट अर्थात पीएमएस ब्लॅकेट आणि भौतिकशास्त्रज्ञ आणि भारतामध्ये संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे पद्मविभूषण सन्मानप्राप्त डॉ. दौलतसिंह कोठारी अर्थात डॉ. डी. एस. कोठारी यांच्या योगदानातून १९५२ मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट स्टडीज’ची (आताची डीआयएटी) स्थापना करण्यात आली. १९६७ मध्ये सध्याच्या गिरिनगर येथे ती हलविण्यात आली. तत्पूर्वी दापोडी येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग येथे ही संस्था चालत असे. या संस्थेतील अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल करण्यात आले. ‘डीआयएटी’ला अभिमत विद्यापीठाचाही आता दर्जा मिळाला आहे.

संरक्षण तंत्रज्ञानामध्ये ‘डीआयएटी’सारखी संस्था असूनही संरक्षण क्षेत्रामधील भविष्यातील तंत्रज्ञानाची विशेष आव्हाने आणि संरक्षण दलांच्या गरजा लक्षात घेऊन या संस्थेतून ‘मिलिट’ ही संस्था वेगळी काढण्यात आली. संरक्षण मंत्रालय, संरक्षण, संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) आणि ‘डीआयएटी’च्या प्रतिनिधींनी दीर्घ काळ चर्चा करून ‘मिलिट’बाबतचा निर्णय घेतला. ‘मिलिट’ या संस्थेची स्थापना १९ जानेवारी २०१२ रोजी झाली. ही संस्था ‘डीआयएटी’मधून वेगळी काढण्यात आल्यानंतरही ३१ मार्च २०१५ पर्यंत संरक्षण, संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अखत्यारित, ‘डीआरडीओ’ची ५२ वी प्रयोगशाळा म्हणून कार्यरत होती. २०१५ मध्ये इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (आयडीएस) अंतर्गत या संस्थेचे ‘आर्म्ड फोर्सेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ (एएफटीआय) म्हणून पुढे काम सुरू राहिले. ‘एएफटीआय’ म्हणून तिचे काम सुरू असले, तरी आजही ‘मिलिट’ म्हणूनच ही संस्था ओळखली जाते.

‘तंत्रज्ञानातून विजय’ (व्हिक्टरी थ्रू टेक्नॉलॉजी) हे संस्थेचे बोधवाक्य आहे. ‘मिलिट’ या संस्थेचे प्रमुख मेजर जनरल किंवा समकक्ष हुद्द्यावरील अधिकारी असतात. तिन्ही दलांतील अधिकारी आलटूनपालटून दोन वर्षांसाठी या संस्थेचे कमांडंट असतात. सध्या रीअर ॲडमिरल व्ही. गणपती या संस्थेचे कमांडंट आहेत. ‘मिलिट’ संस्थेला संरक्षण दलप्रमुख केंद्राकडून २०२३-२४ या प्रशिक्षण वर्षाकरिता पुरस्कार मिळाला आहे.

या संस्थेत ‘डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स’ आणि संरक्षण दलांतील अधिकाऱ्यांसाठी अनेक अभ्यासक्रम राबविले जातात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी अधिकाऱ्यांना अवगत केले जाते. संरक्षण दलांतील अधिकाऱ्यांसाठी तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम चालविणारी ‘मिलिट’ ही पहिली संस्था आहे. तिन्ही दलांतील अधिकाऱ्यांसाठी तंत्रज्ञानाशी संबंधित २३ अभ्यासक्रम संस्थेद्वारे चालविले जातात. या अभ्यासक्रमांचा कालावधी एक ते ४६ आठवडे इतका असतो. संस्थेमध्ये प्रशिक्षण समन्वय आणि प्रशासन असे दोन विभाग आहेत. भूदल, नौदल, हवाई दल आणि शस्तास्त्रे अशा चार भिन्न क्षेत्रांशी संबंधित प्रशिक्षणाला संस्थेचे हे दोन विभाग मदत करतात.

‘मिलिट’ ही संस्था सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले डोणजे गाव या संस्थेने २०१८ मध्ये दत्तक घेतले. या ठिकाणी कचरा व्यवस्थापन, शिक्षण, शेती गावातील तरुणांना प्रशिक्षण असे उपक्रम संस्थेने राबविले.

सामाजिक कार्यासह संरक्षण क्षेत्रात तिन्ही दलांतील अधिकाऱ्यांना तंत्रकुशल करण्यापर्यंत ही संस्था सातत्याने अग्रस्थानी आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात संरक्षण दलांतील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यातील या संस्थेला देशामध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. पुण्याची ओळख म्हणजे फक्त ‘एनडीए’ इतकीच नसून, तंत्रकुशलतेचे शिक्षण देणारी ‘मिलिट’ ही संस्थादेखील तितकीच महत्त्वाची आहे. prasad.kulkarni@expressindia.com