दुधाला उच्चांकी भाव ! कोजागिरीसाठी गणेश पेठेतील दूध बाजारात एक लिटर दूध ६५ ते ७० रुपये लिटर

गेल्या वर्षी दुधाला प्रतिलिटर ५० रुपये लिटर असा भाव मिळाला होता

पुणे : कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक दूध बाजारात दुधाची मोठी आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी वाढली असून दूध बाजारात एक लिटर दुधाला ६५ ते ७० रुपये लिटर असा भाव मिळाला.

कोजागिरी पौर्णिमा मंगळवारी (१९ ऑक्टोबर) आहे. शीतल चांदण्यात आटीव दुधाचा आस्वाद घेऊन कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. शहरातील गणेश पेठेत मुख्य दूध बाजार (दूधभट्टी) आहे. शहरातील मिठाई विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच केटरिंग व्यावसायिक दूध बाजारातून खरेदी करतात. गेल्या वर्षी करोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक स्वरूपात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी दुधाला प्रतिलिटर ५० रुपये लिटर असा भाव मिळाला होता. यंदाच्या वर्षी निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदा दुधाला मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांकडून दुधाला चांगली मागणी आहे, अशी माहिती गणेश पेठ दूध बाजार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रामदास काळे आणि उपाध्यक्ष दामोदर तथा तात्यासाहेब हिंगमिरे यांनी दिली.

दूध बाजारात पुणे शहरातील लष्कर, अरण्येश्वर, कात्रज परिसरातील गवळी वाडय़ातून आवक झाली,तसेच नगर रस्त्यावरील केसनंद, वाघोली आणि मावळातील शेतक ऱ्यांनी दूध विक्रीस पाठविले. सोमवारी (१८ ऑक्टोबर) दूध बाजारात तीन हजार लिटर दुधाची आवक झाली. सार्वजनिक मंडळांकडून दूध खरेदीची नोंदणी झाली तसेच मिठाई विक्रेत्यांकडून मोठय़ा प्रमाणावर खरेदी झाली. मंगळवारी दुधाला चांगली मागणी राहील, असे त्यांनी नमूद केले.

दिवाळीपर्यंत दुधाला मागणी

नवरात्रोत्सवात दुधाच्या मागणीत वाढ झाली होती. नवरात्रोत्सव ते दिवाळीपर्यंत दुधाला चांगली मागणी असते. मिठाई विक्रेत्यांकडून दुधाची मोठय़ा प्रमाणावर खरेदी करण्यात येते. यंदाच्या वर्षी दुधाला मोठी मागणी असून नवरात्रोत्सवात दुधाला उच्चांकी भाव मिळाला होता. नवरात्रोत्सवात अनेक जण उपवास करतात. त्यामुळे दुधाच्या मागणीत वाढ होते, असे गणेश पेठ दूध बाजार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रामदास काळे, उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी सांगितले.

दुधाचे भाव

१८ लिटर घागर-११६० रुपये

एक लिटर- ६५ ते ७० रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Milk 65 to rupees per liter in ganesh peth milk market zws

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या