शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑल इंडिया मज्जलिस-ई-इत्तेहादिल मुस्लिमीन (एआयएमआयएम) च्या उमेदवारांना महापालिका निवडणुकीत तिकीट देताना पाच ते दहा लाख रुपयांची मागणी औरंगाबादचे आमदार इम्तीयाज जलील यांनी केल्याचा आरोप पक्षाचे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांनी बुधवारी केला.

महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत एमआयएमला येरवडय़ातून एका जागेवर विजय मिळविता आला. या पाश्र्वभूमीवर शहराध्यक्ष शेख यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. निवडणुकीत पक्षाची तिकिटे मनमानी पद्धतीने वाटप झाल्याचेही त्यांनी सांगितले.

‘तिकिटांचे वाटप करताना औरंगाबादचे आमदार इम्तीयाज जलील यांनी मनमानी पद्धत अवलंबली होती. शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आले. काही ठिकाणी उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळेच पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. निवडणूक लढविणाऱ्या काही उमेदवारांकडून पाच ते दहा लाखांची मागणी करण्यात आली. मला पाडण्यासाठी आमदारांनी काँग्रेस पक्षाकडून सुपारी घेतली होती. निवडणुकीवेळी पक्षाचे पाच ते सहा नगरसेवक आमदार जलील यांच्यासोबत औरंगाबाद येथून पुण्यात आले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील उमेदवारांकडून पैसे गोळा केले. पक्षाच्या सर्व पराभवाची जबाबदारी ही आमदार इत्मीयाज जलील यांचीच आहे. निवडणुकीपूर्वी आठ महिने आधीपासून आम्ही जलील यांना निमंत्रित करीत होतो. गेल्या तीन महिन्यांपासून तर ते दूरध्वनीही घेत नव्हते. निवडणुकीला फक्त पाच दिवस राहिले असताना त्यांनी पुण्यात येऊन येथील वातावरण खराब केले. शहरात जेवढय़ा सभा, मेळावे झाले त्याचा संपूर्ण खर्च आम्हीच केला,’ असा आरोप शेख यांनी केला. यासंदर्भात पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim mla imtiyaz jaleel
First published on: 02-03-2017 at 02:44 IST