पुणे : देशभरातील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे किमान आणि कमाल शुल्क बदलणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) बदललेल्या शुल्क रचनेचा प्रस्ताव केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला सादर केला आहे. या प्रस्तावानुसार पदवीपूर्व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी किमान शुल्क ७९ हजार, तर कमाल शुल्क १ लाख ८९ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.
एआयसीटीईच्या कार्यकारी समितीने निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसींचा अहवाल नुकताच मान्य करून तो केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला सादर केला आहे. आता शिक्षण मंत्रालयमच्या पातळीवर त्याची पडताळणी करण्यात येईल. जवळपास सात वर्षांनी तज्ज्ञ समितीने कमाल शुल्काची शिफारस केली आहे. त्यानुसार संस्था शैक्षणिक शुल्क आकारू शकतात. मात्र आतापर्यंत किमान शुल्क अस्तित्वात नव्हते. एआयसीटीई कायद्यातील कलम १० नुसार परिषद शैक्षणिक शुल्क आणि इतर शुल्क आकारणीबाबतचे निकष ठरवू शकते असे नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तंत्रशिक्षणाचे व्यावसायिकीकरण रोखण्यासाठी श्रीकृष्ण समितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीने किमान शुल्क ७९ हजार, तर कमाल शुल्क १ लाख ८९ हजार रुपये प्रस्तावित केले आहे. या पूर्वी २०१५ मध्ये समितीने चार वर्षांच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी कमाल शुल्क १ लाख ४४ हजार ते १ लाख ५८ हजार निश्चित केले होते. आता नव्या शिफारसींच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयासह राज्य शासनांकडूनही मान्यता मिळणे आवश्यक आहे.
आतापर्यंत किमान शुल्क निश्चित करण्यात आलेली नसल्याने राज्य प्राधिकरणांकडून अव्यवहार्य पद्धतीने शुल्क निश्चिती केली जात असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येत असल्याचा आक्षेप नोंदवत अनेक खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून शैक्षणिक शुल्कासाठीची किमान पातळी निश्चित करण्याची मागणी एआयसीटीईकडे करण्यात येत होती. त्यानुसार शुल्क रचनेकडे नव्याने पाहून किमान पातळी निश्चित करण्याची विनंती केंद्राने श्रीकृष्ण समितीला केली होती.
शुल्क किती?

  • नव्या शिफारसीनुसार अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी किमान शुल्क ६७ हजार रुपये आणि कमाल शुल्क १ लाख ४ हजार प्रस्तावित करण्यात आले आहे.
  • पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी कमाल आणि किमान शुल्क अनुक्रमे ३ लाख ३ हजार आणि १ लाख ४१ हजार रुपये प्रस्तावित आहे.