पुणे : ‘माणसाचे जीवन समृद्ध होईल, यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या पुलंच्या नावाने अध्यासन सुरू करावे,’ अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी करताच त्याची दखल घेऊन ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुलंच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येईल’, अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून करोनाकाळात बंद पडलेल्या ‘ग्लोबल पुलोत्सव’चे उद्घाटन मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी महोत्सवाचे निमंत्रक या नात्याने चंद्रकांत पाटील बोलत होते. सुनीताबाईंचे बंधू सर्वोत्तम ऊर्फ मोहन ठाकूर, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे विभागीय प्रमुख सुशील जाधव, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ गायिका डाॅ. प्रभा अत्रे यांच्या ‘स्वरमयी गुरुकुल’ संस्थेस प्रदान करण्यात आलेला विशेष पु. ल. पुरस्कार डॉ. भारती एम. डी. आणि प्रसाद भडसावळे यांनी स्वीकारला.

‘महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या पुलंच्या नावाने अध्यासन लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. सुरुवातीला प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुलंच्या साहित्याचा अभ्यास करतील. या अध्यासनाचा अभ्यासक्रम आशय निर्माण करण्यासाठी कर्णिक यांनी मदत करावी’, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. पुलोत्सवाच्या काळात पुलंच्या साहित्यावर प्रकाशकांकडून देण्यात येणाऱ्या सवलतीसह अतिरिक्त मिळून ५० टक्के सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली. पुण्यासह महाराष्ट्रातील दहा प्रमुख शहरांमध्ये हा पुलोत्सव आयोजित करावा, अशी सूचनाही त्यांनी आयोजकांना केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्णिक म्हणाले, ‘जगभरातील सर्व मराठी माणसांना पुलं आणि त्यांचे साहित्य ज्ञात आहे. हसवता हसवता तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारे आणि प्रगल्भ करणारे पुलं त्यांच्या लेखणीतून वाचकाला चिंतनशील बनवत. डॉ. राम मनोहर लोहिया, सेनापती बापट, विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, कोल्हापूरचे शाहू महाराज आणि कर्मयोगी बाबा आमटे अशा दिग्गजांची व्यक्तिचित्रे त्यांनी संवेदनशीलतेने रेखाटली आहेत. समाजाविषयी कळवळा आणि वात्सल्य असलेले पुलं हे समाजचिंतक होते.’ स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.