उजनी धरणाचे पाणी बारामती, इंदापूरला देण्याबाबत सोलापूरकरांमध्ये रोष दिसून येत आहे. मात्र, उजनीच्या पाण्याबाबत कोणताही दुजाभाव झालेला नाही. ही योजना काय, ती कशी अंमलात येणार, या योजनेमुळे कोणाचेही पाणी कमी कसे होणार नाही, याची सर्व माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील येत्या दोन दिवसांत जाहीर करतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले.

उजनी धरणातून इंदापूर, बारामतीमधील काही गावांना लाकडी निंबोडी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. त्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजना रद्दची मागणी करत आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पाण्यासंदर्भात कोणताही दुजाभाव कोणासोबतही होणार नाही. पाण्यावर सगळ्यांचा हक्क आहे. सोलापूरला पण पाणी मिळाले पाहिजे. ही योजना काय, याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे दोन दिवसांत माहिती देतील. उजनी धरणावर बॅरेजेस बांधून पावसाचे अतिरिक्त वाया जाणारे पाणी पुन्हा धरणात येत आहे. त्यामुळे सोलापूरच्या पाण्यात कोणत्याही प्रकारची कपात होणार नाही.’