समस्तर प्रवेश पद्धतीने परराष्ट्र मंत्रालयात पुण्याच्या डॉ. प्रियंका जावळे यांची निवड

केंद्र सरकारच्या समस्तर प्रवेश पद्धतीअंतर्गत (लॅटरल एंट्री) परराष्ट्र मंत्रालयात पुण्याच्या डॉ. प्रियंका जावळे यांची निवड झाली आहे.

विधी आणि करार विभागात अधिकारीपदी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या समस्तर प्रवेश पद्धतीअंतर्गत (लॅटरल एंट्री) परराष्ट्र मंत्रालयात पुण्याच्या डॉ. प्रियंका जावळे यांची निवड झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयातील विधी आणि करार विभागात विधी अधिकारी या पदावर प्रियंका यांना संधी मिळाली आहे.

परराष्ट्र मंत्रालयातील विधी आणि करार विभागात विधी अधिकारी म्हणून सहा जागांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत समस्तर प्रवेश पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात देशभरातून आलेल्या अर्जाची छाननी करून १८८ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. मुलाखतीतून तीन उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात प्रियंका जावळे यांचा समावेश आहे. मूळच्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडीच्या असलेल्या प्रियंका यांनी मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयएलएस विधी महाविद्यालयातून पदवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागातून पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. संपादन केली. तसेच वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दुर्गाबिनी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियंका पोस्ट डॉक फेलो म्हणून संशोधन करत आहेत. अणू ऊर्जा कायदा, अवकाश कायदा आणि धोरण हे प्रियंका यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. आतापर्यंत काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये प्रियंकाला सादरीकरणाची संधी मिळाली आहे.

गेली अकरा वर्षे अणू ऊर्जा आणि अवकाश कायदा-धोरण या विषयात ती काम करत आहे. माझ्या अभ्यासाचा देशाला उपयोग व्हावा हा विचार होता. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाची जाहिरात पाहिल्यावर अर्ज करायचा निर्णय घेतला. आता प्रत्यक्ष निवड झाल्याचा आनंद आहे. पहिल्याच प्रयत्नात संधीही मिळाली. अणू ऊर्जा कायदा, अवकाश कायदा आणि धोरण या विषयातील अभ्यासक भारतात फारच थोडे आहेत. त्यामुळे या पदावर संधी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी काहीतरी करता येईल, अशी भावना प्रियंका यांनी व्यक्त केली.

समस्तर प्रवेश पद्धतीविषयी..

केंद्र सरकारकडून २०१८पासून समस्तर प्रवेश पद्धतीअंतर्गत निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. समस्तर पद्धतीअंतर्गत काही विशिष्ट पदांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा टाळून केवळ मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येते. त्यासाठी संबंधित विषयांमध्ये तज्ज्ञ असलेल्या उमेदवारांची प्रशासनात नियुक्ती केली जाते.

विधी अभ्यासक्रम पूर्ण करून यूपीएससी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा अनेक विद्यार्थी देतात. पण विज्ञान तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत असल्याने त्या अनुषंगाने विज्ञान तंत्रज्ञान कायदा, आंतरराष्ट्रीय कायदा अशा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नव्या संधींकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी स्वत:ला सज्ज करायला हवे.

डॉ. ज्योती भाकरे, विधी विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ministry external affairs selection priyanka jawale ysh

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या