पुण्यात अल्पवयीन मुलाला नग्न करुन बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला कोयता आणि पट्ट्याच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. १२ मार्च रोजी पुण्यातील हडपसर येथे ही घटना घडली आहे. मुलाला मारहाण करत असताना आरोपी तरुणांनी व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरुन वाद झाल्यानंतर १६ वर्षीय पीडित तरुणाचं अपहरण करण्यात आलं. यानंतर त्याला कोयता आणि पट्टयाच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. धक्कायदक म्हणजे आरोपी तरुणांनी पीडित मुलाच्या चेहऱ्यावर लघुशंकादेखील केली. मुलगा सध्या बेशुद्धावस्थेत असून ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

शिवजयंतीच्या निमित्ताने मुलगा घराबाहेर पडला होता. पण रात्री मुलगा घरी न परतल्याने त्याच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांना मुलगा रेल्वे ट्रॅकजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी त्याच्या आईच्या माध्यमातून ओळख पटवली. मारहाणीचे कारण अद्याप कळलेलं नसून पोलीस तपास करत आहेत.