लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाने याबाबतचे आदेश बुधवारी रात्री दिले.

बाल न्याय मंडळाचे प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे, के. टी. थोरात यांच्या मंडळासमोर सुनावणी झाली. बुधवारी दिवसभर या प्रकरणावर सुनावणी झाली होती. सुनावणी झाल्यानंतर मंडळाने निकाल राखून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास बाल न्याय मंडळाने निकाल दिला. त्यानंतर मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

आणखी वाचा-Pune Accident : “दोन उद्ध्वस्त कुटुंबांचे अश्रू पुसायचे सोडून बिल्डरची बाजू घेताय?” धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना टोला

आरोपीला देण्यात आलेल्या जामिनाचा पुनर्विचार करण्यात यावा, यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने पोलिसांना बाल न्याय मंडळात अर्ज करण्याची सूचना केली होती. बाल न्याय मंडळात बुधवारी दिवसभर सुनावणी झाली.

कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातानंतर आरोपीविषयी समाजात रोष आहे. त्यातून त्याला इजा पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याने बाहेर राहणे धोकादायक ठरू शकते, असे म्हणणे पोलिसांनी सादर केले. जामीन झाल्यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यासाठी काही बदल गरजेचे आहेत. त्यामुळे आता त्याला सुधारगृहात पाठवणे कायदेशीर नाही, असा युक्तिवाद मुलाचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांनी केला. लेखी आदेश मिळाल्यानंतर याबाबत अपील करण्यात येणार असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा-Porsche Car Accident : आरटीओचा दणका! ‘पोर्श’ची तात्पुरती नोंदणीही होणार रद्द; पुढील १२ महिने नोंदणीस मनाई

‘सज्ञान’ घोषित करण्याच्या अर्जावर सुनावणी नाही

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला सज्ञान ठरवावे, अशी मागणी पोलिसांनी केली होती. सज्ञान आरोपींप्रमाणे त्याच्यावर कारवाईची मागणीही पोलिसांकडून करण्यात आली होती. ‘गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन दिवसांत आरोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे. दोन महिने त्याच्या मानसिक, शारीरिक स्थितीविषयीची पाहणी करण्यात येते. त्या काळात मुलाला सुधारगृहात ठेवण्याची आवश्यकता नसते. ही प्रक्रिया ६० ते ९० दिवसांची आहे. त्यानंतर मुलाला सज्ञान ठरविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येतो,’ असे ॲड. पाटील यांनी नमूद केले.