पुणे : येरवडा भागात पादचाऱ्याकडील एक लाख रुपयांचा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या अल्पवयीनाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. अल्पवयीनाने येरवडा, तसेच महापालिका भवन परिसरात मोबाइल हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून एक लाख रुपयांचा मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे.

येरवडा भागात तीन दिवसांपूर्वी रात्री एका पादचारी तरुणाकडील एक लाख रुपयांचा मोबाइल हिसकावून अल्पवयीन आणि त्याचा साथीदार दुचाकीवरुन पसार झाले होते. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट चार, तसेच दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकडून तपास करण्यात येत होता. खडकीतील मुळा रस्ता परिसरात एक जण मोबाइल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून अल्पवयीनाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने येरवडा भागात एकाकडील मोबाइल हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्याच दिवशी रात्री त्याने महापालिका भवन परिसरात एकाकडील मोबाइल संच हिसकावून नेला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महापालिका भवन परिसरात हिसकावलेला मोबाइल संच त्याच्या साथीदाराकडे असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. अल्पवयीनाने साथीदाराच्या मदतीने मोबइल हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपयाुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक वैभव मगदूम, एकनाथ जोशी, प्रवीण राजपूत, प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, अमजद शेख, किशोर दुशिंग यांनी ही कामगिरी केली.

प्रभात रस्त्यावर मोबाइल हिसकावला

प्रभात रस्ता परिसरात एका तरुणाकडील ९० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शिवाजीनगर गावठाण भागात राहायला आहे. १२ फेब्रुवारी राेजी तो प्रभात रस्त्यावरील पार्थ बिल्डींगसमोर थांबला होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी तरुणाकडील ९० हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. तरुणाने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेागत दुचाकीवरुन पसार झाले. पाेलीस उपनिरीक्षक संदीप कदम तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.