पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीस ए. एस. वाघमारे यांनी सुनावली. मुलीचे अपहरण प्रकरणात तिच्या मैत्रिणीसह दोघांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
बलात्कार प्रकरणात रिजवान इक्राबद्दीन अन्सारी (वय ३५, रा. उत्तमनगर), दशरथ आत्माराम चव्हाण (वय २२, वडगाव बुद्रुक) यांना २० वर्षे सुनावण्यात आली आहे. आरोपी रिजवानला १३ हजार ५०० रुपये, तसेच दशरथला दहा हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. मुलीचे अपहरण प्रकरणात मैत्रिण उज्ज्वला रविंद्र आतकरे (वय २३, सिंहगड रस्ता) आणि साजिद बुंदु अन्सारी (वय २६, रा. एरंडवणे) यांना १० वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली आहे. आरोपी उज्वल हिला साडेसात हजार आणि साजिद याला तीन हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे दंडापैकी पीडितेला २० हजार रुपये देण्यात यावेत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
पीडित मुलीची उज्ज्वला मैत्रिण आहे. पीडित मुलगी घरी निघाली होती. त्या वेळी तिचा मोबाइल संच रस्त्यात पडला. मोबाइल बिघडल्याने कुटुंबीय ओरडतील, अशी भीती तिला वाटली. त्यानंतर ती मैत्रिण उज्ज्वला हिच्याकडे गेली. मोबाइल संच दुरूस्त करुन देते, असे तिने पीडित मुलीला सांगितले. त्यानंतर उज्ज्वलाने मित्र रिजवान आणि दशरथ यांना घरी बोलाविले. त्यानंतर पीडित मुलीला धमकावून दशरथने तिच्यावर बलात्कार केला. मोबाइल दुरुस्तीसाठी तळेगाव दाभाडे येथे जावे लागेल, असे त्यांनी मुलीला सांगितले. मुलीने नकार दिल्यानंतर तिला धमकाविण्यात आले. रिक्षातून आरोपी साजीद आणि रिजवान मुलीला घेऊन भूगाव येथील एका लाॅजवर गेले. रिजवानने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केल्यानंतर रिजवानने मारहाण केली, तसेच साजीद आणि उज्ज्वलाने धमकावले, असे पीडित मुलीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते.
याप्रकरणाचा दत्तवाडी पोलिसांनी तपास करुन आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी बाजू मांडली. पीडित मुलीची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.