पुणे : बालसुधारगृहातून सुटल्यानंतर एका अल्पवयीन मुलाने बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना येरवडा भागात घडली. अल्पवयीन मुलाने केलेल्या हल्ल्यात राजेंद्र देडे (वय ५१, रा. चिखली) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देडे यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा भागातील बालसुधारगृहात देडे कर्मचारी आहेत. गंभीर गु्न्ह्यात सामील असलेल्या मुलांना बाल न्याय मंडळाच्या आदेशाने येरवड्यातील बालसुधारगृहात ठेवण्यात येते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहातून नुकताच बाहेर आला होता.

सोमवारी (४ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास देडे येरवड्यातील गुंजन टॉकीज चौकातून जात होते. त्या वेळी अल्पवयीन मुलाने त्यांना अडवले. सुधारगृहात तुला माज आला होता. तुला दाखवितो, मी कोण आहे असे अल्पवयीन मुलगा देडे यांना म्हणाला. त्यानंतर अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील कुऱ्हाडीने देडे यांच्यावर हल्ला चढविला. देडे यांच्या हातावर कुऱ्हाडीचा घाव बसल्याने ते जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर तपास करत आहेत.