अल्पवयीन मुलाला अटक; चार दुचाकी जप्त
खबरे म्हणजे पोलिसांचे कान आणि डोळे. अनेक गंभीर गुन्ह्य़ांच्या तपासात पोलीस खबऱ्यांची मदत घेतात. किंबहुना गंभीर गुन्ह्य़ांचा छडा लावण्यासाठी पोलिसांबरोबरच खबऱ्यांचा मोठा वाटा असतो. तीन महिन्यांपूर्वी एक अल्पवयीन मुलगा पोलिसांसाठी खबऱ्या म्हणून काम करू लागला. एरंडवणे, वारजे भागातून चोरलेल्या दुचाकी तसेच संशयित चोरटय़ांची माहिती देण्यास सुरुवात केली. त्याने दिलेली प्रत्येक माहिती दिशाभूल करणारी ठरली. अखेर पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेतले आणि खबऱ्या म्हणून काम करणारा मुलगाच दुचाकी चोरटा निघाला.
या प्रकरणात अलंकार पोलिसांकडून एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कोथरूडमधील सुतारदरा भागात राहणाऱ्या मुलाचे कुटुंबीय मूळचे मुळशी तालुक्यातील आहेत.
तीन ते चार महिन्यांपूर्वी मुलगा एरंडवणे भागातील अलंकार पोलीस ठाण्यात आला. त्याने पोलिसांना मला दुचाकी चोरीची माहिती असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्याने काही मुलांची नावे सांगितली. या मुलांनी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याने दिलेली नावे आणि पत्यावर जाऊन चौकशी केली. तेव्हा असे नाव असलेला चोरटा त्या भागात राहत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्याने पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली.
पोलिसांकडून शाहनिशा करण्यात आली. तेव्हा ती माहिती खोटी निघाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने एरंडवणे, वारजे भागातून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या. चौकशीत त्याने मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले. दुचाकीतील पेट्रोल संपल्यानंतर तो दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून पसार व्हायचा.
अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, अभय देशपांडे, नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, उस्मान कल्याणी, किरण नेवसे, श्रीकांत चव्हाण, योगेश बडगे यांनी ही कारवाई केली.