लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून मोटार चालविल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मुलाच्या रक्ताचे दोन नमुने घेण्यात आले होते. ससूनच्या नमुन्यात डॉक्टरांनी फेरफार केल्याने त्यांना अटक करण्यात आली. मात्र, औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यात मद्यांश असल्याचे आढळून आले नाही. अपघातांतर दीड तासाच्या आत रक्ताचे नमुने न घेतल्याने रक्तात मद्यांश आढळून आला नसल्याचे उघडकीस आले आहे.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलास ताब्यात घेण्यात आले. अपघातानंतर सकाळी नऊच्या सुमारास मुलाला ससून रुग्णालयात नेण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास रक्ताचे नमुने घेण्यात आले. ससून रुग्णालयातील प्राथमिक रक्ततपासणी अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना संशय आल्याने १९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ओैंध येथील जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. रक्ताच्या नमुन्याचे अहवाल रविवारी (२६ मे) पोलिसांना मिळाले. दोन्ही अहवालांत मुलाच्या रक्तात मद्यांश आढळून आला नाही.

आणखी वाचा-पुणे : रक्ताचे नमुने देणारा कोण? पोलिसांकडून तपास सुरू

मद्यांश न आढळण्यामागची कारणे काय?

अपघातानंतर साडेआठ तासांनी १९ मे रोजी सकाळी अकरा वाजता ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर १८ तासांनी औंध रुग्णालयात सायंकाळी सातच्या सुमारास मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. गंभीर गुन्ह्यात आरोपीने मद्यप्राशन केल्याचा संशय असल्यास घटना घडल्यानंतर पहिल्या दीड तासात रक्ताचे नमुने घेणे आवश्यक असते. मद्यप्राशन केल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात २४ तास मद्यांश (अल्कोहोल) आढळून येते. मद्यप्राशन केल्यानंतर एखाद्याने पाव, चीज सेवन केल्यास किंवा नैसर्गिक विधी केल्यास मद्यांशाचे प्रमाण कमी होत जाते. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटुंबीयांनी येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झा खाण्यास दिला होता. त्यामुळे त्याच्या रक्तातील मद्यांश कमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खटल्यावर परिणाम

अल्पवयीन मुलाच्या रक्तात मद्यांश आढळून आला नसल्याचा अहवाल मिळाला. बाल न्याय कायद्यातील कलम ७५, ७७ अन्वये आरोपी विशाल अगरवाल, अल्पवयीन मुलाला मद्य विक्री प्रकरणात कोझी आणि ब्लॅक पबच्या मालकासह कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन मुलाच्या रक्तात मद्यांश आढळून न आल्याने खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.