पुणे : बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेली दहा वर्षांची मतिमंद मुलगी सापडली. बुधवारी (१४ ऑगस्ट) बिबवेवाडी भागातील पापळ वस्ती परिसरात राहणारी मतिमंद मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यात येत होता. गुरुवारी रात्री मुलगी सापडली. बिबवेवाडीतील पापळ वस्तीत राहणारी मुलगी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास बेपत्ता झाली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला.

मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी बिबवेवाडी, कात्रज परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. मुलगी कात्रज परिसरात असल्याचे दिसून आले. चित्रीकरणात एक संशयित आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती छायाचित्रासह समाजमाध्यमात प्रसारित केली. मुलगी कात्रजकडे गेल्याचे आढळून आले होते. बेपत्ता मुलीची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.

हेही वाचा…बारामतीमध्ये लढण्यात रस नाही – अजित पवार

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यास भेट दिली. तपासाबाबत त्यांनी सूचना केल्या. गुन्हे शाखेच्या पथकांकडून गुरुवारी (१५ ऑगस्ट) दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर रात्री मुलीचा शोध लागला. तिला बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलगी सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.