पुणे : ससून रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. सुरुवातीला या रुग्णाला ‘ससून’मधून सोडल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले होते. मात्र, या रुग्णाला पुन्हा बेवारस म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला असावा, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली. दरम्यान, या रुग्णाच्या छायाचित्राच्या आधारे त्यांच्या पत्नीने ओळख पटविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ससूनमधून प्रकाश पुरोहित हे साठ वर्षीय रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी दिली होती. ससून रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार विचारणा करूनही रुग्णाची माहिती मिळत नसल्याने नातेवाइकांनी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान, या प्रकरणावर ससून रुग्णालय प्रशासनाने गुरूवारी (ता.२०) खुलासा केला. त्यानुसार, रुग्णाला २३ सप्टेंबर २०२४ रोजी ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ४ डिसेंबर २०२४ पर्यंत उपचार सुरू होते. त्यांच्यावर ७२ दिवस उपचार केल्यानंतर ते बरे झाले. या काळात त्यांचे कोणीही नातेवाइक न आल्याने त्यांना ४ डिसेंबरला पुनर्वसनासाठी दादासाहेब गायकवाड यांच्या वृद्धाश्रमात सोपविण्यात आले.
ससून रुग्णालय प्रशासनाने नंतर या प्रकरणी पुन्हा खुलासा करून या रुग्णाचा मृत्यू ससूनमध्येच उपचारांदरम्यान झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली. ‘संबंधित वृद्धाश्रमाने एका ६० वर्षीय रुग्णाला या वर्षी १२ फेब्रुवारीला ससूनमध्ये दाखल केले होते. उपचारांदरम्यान या रुग्णाचा ७ मार्चला मृत्यू झाला होता. दादासाहेब गायकवाड यांनी या रुग्णाला दाखल करताना तो बेवारस असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तो रुग्ण बेवारस असल्याचे समजून बंडगार्डन पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांची कार्यवाही झाल्यानंतर या रुग्णाची बेवारस म्हणून पुढे विल्हेवाट लावण्यात आली,’ असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
अशी पटली ओळख…
‘बंडगार्डन पोलीस ठाण्यात प्रकाश पुरोहित यांच्या पत्नीला शुक्रवारी बोलावून घेण्यात आले. पुरोहित यांचा बेवारस मृत्यू म्हणून नोंद करताना काढलेली छायाचित्रे त्यांना दाखविण्यात आली. यावरून पत्नीने त्यांची ओळख पटविली. या प्रकरणी बेवारस मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटल्याचा अहवाल ससून रुग्णालय प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद करून पुढील कागदपत्रे त्यांच्या नातेवाइकांना देण्याची विनंती रुग्णालयाकडे केली जाणार आहे,’ अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.
रुग्ण ते बेवारस मृत्यू असा प्रवास
- २३ सप्टेंबर २०२४ : ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल
- ४ डिसेंबर २०२४ : ‘ससून’मधून वृद्धाश्रमात
- १२ फेब्रुवारी २०२५ : पुन्हा ‘ससून’मध्ये उपचारांसाठी दाखल
- ७ मार्च २०२५ : उपचारांदरम्यान ‘ससून’मध्ये मृत्यू
- ७ मार्च २०२५ : ‘ससून’कडून बेवारस मृत्यू म्हणून पोलिसांकडे नोंद
