शुद्धिपत्रकातही पानोपानी चुकाच!

अकरावीच्या जीवशास्त्र इंग्रजी पुस्तकाबाबतचा प्रकार

‘लोकसत्ता’ने २१ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेले वृत्त.

 

महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) अकरावीच्या जीवशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकाच्या पानोपानी असलेल्या चुकांबाबत सात पृष्ठांचे शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र, या शुद्धिपत्रकातही पानोपानी चुकाच असल्याचा प्रकार समोर आला आहे.

गरवारे महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या डॉ. हेमलता साने यांनी पुस्तकातील चुकांचा तपशीलवार अहवालच बालभारतीला सादर केला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २१ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर बालभारतीचे संचालक विवेक गोसावी आणि विषय समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता बालभारतीने शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून या दुरुस्तीनुसार अध्यापन करण्याबाबत स्पष्ट केले आहे. या शुद्धिपत्रकात पुस्तकाच्या पहिल्या पृष्ठापासून पृष्ठ क्रमांक १६० पर्यंतच्या जवळपास ७८ दुरुस्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातही तपशिलाच्या आणि व्याकरणाच्या चुका असल्याचे डॉ. साने यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

बालभारतीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रकातील चुकांची माहिती डॉ. साने यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. तसेच बालभारतीला चार पानी सविस्तर पत्र लिहून तीव्र शब्दांत शुद्धिपत्रकाबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. ‘पुस्तकातील चुका तपशीलवार दाखवूनही त्याची दखल घेतली जात नाही हे योग्य नाही. तथाकथित अभ्यास मंडळाचे सदस्य खरोखरीच अभ्यास करून पुस्तक लिहितात का, असा प्रश्न पडला आहे. उदाहरणार्थ फोटोसिन्थेसिस या प्रकरणातील चुका दुरुस्त करण्याऐवजी चुका वाढवण्यात आल्याचे शुद्धिपत्रकातून दिसून आले. आकृत्यांचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पुस्तकात चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याचा विचार संबंधितांनी करण्याची गरज आहे. या शुद्धिपत्रकातील चुकांबाबत पुन्हा सविस्तर पत्र लिहून कळवले आहे. या चुकांची दुरुस्ती होणे आवश्यकच आहे,’ असे डॉ. साने यांनी नमूद केले.

डॉ. हेमलता साने यांनी दाखवून दिलेल्या चुकांची अभ्यास मंडळाने सखोल तपासणी केली. त्यातील काही चुकांची दुरुस्तीही करण्यात आली आहे. शुद्धिपत्रकातील चुकांसंदर्भातील त्यांनी पाठवलेले पत्रही वाचले आहे. मात्र, आता त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. अभ्यास मंडळाने काही एक निर्णय घेऊन दुरुस्ती केली आहे.

– विवेक गोसावी, संचालक, बालभारती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mistakes in the eleventh biology english book abn