पुणे : घरभाडे भत्त्याच्या वार्षिक कर कपातीसाठी जवळपास ३०० कंपन्यांनी माजी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या मुलाचा पॅनकार्ड क्रमांक वापरुन करचुकवेगिरी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणातील फिर्यादीला प्राप्तीकर विभागाची नोटीस आल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. याबाबत एका ७४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पॅनकार्ड क्रमांकाचा वापर करणारे विविध कंपन्यांचे कर्मचारी, सनदी लेखापाल, तसेच एका ईमेल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. त्यांचा मुलगा नेदरलँड येथे वास्तव्यास आहे. त्याने २०११ मध्ये पॅनकार्ड घेतले होते. नेदरलँड येथे वास्तव्यास आणि नोकरीस असल्याने त्याचे भारतात कुठलेही करपात्र उत्पन्न नाही. त्यामुळे हे पॅनकार्ड वापरण्यात येत नव्हते. २०१९ मध्ये फिर्यादी यांच्या मुलाचे पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात आले. त्यावेळी २०११ पासून अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून टॅक्स कलेक्शन अकाऊंट नंबर (टॅन) धारकांनी टीडीएस वजावटीसाठी वापरल्याचे समजले. त्यानंतर फिर्यादी यांनी मुलाकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा पॅनकार्ड क्रमांक कोणालाही वापरायला दिला नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर प्राप्तीकर विभागाकडून फिर्यादी यांच्या मुलाला नोटीस आली. हेही वाचा - Pune Crime : पुण्यात ११ वर्षांपूर्वी झाली होती ७२ वर्षीय वृद्धेची हत्या, सदाशिव पेठेतल्या खुनाचं गूढ अद्याप कायम हेही वाचा - जीव धोक्यात घालून पर्यटन; लोणावळ्यात २६ पर्यटकांवर गुन्हे; प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई पॅनकार्डचा वापर विविध कंपन्यांमधील कर्मचारी हे घरभाड्याच्या करकपातीसाठी वापरत होते, तसेच कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेले घरभाडे करार, घरमालक, त्यांच्या पॅनकार्डची कोणतीही शहानिशा न करता त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावर विश्वास ठेवून करकपात केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांच्या मुलाचा पॅनकार्डचा वापर करुन वित्तीय वर्ष २०२०- २०२१ मध्ये ११७ कंपन्या, २०२१-२०२२ मध्ये १०४ कंपन्या आणि २०२२-२०२३ मध्ये ८० कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या वार्षिक करामध्ये वजावट केली आहे. प्राप्तीकर विभागाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.